लोणावळा नगरपरिषदेत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्याची शिवसेनेची मागणी
लोणावळा : मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोणावळा नगरपरिषद सभागृह व कार्यालयात त्यांची प्रतिमा लावण्यात यावी, अशी मागणी शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे तसेच नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांना देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन 2026-27 हे वर्ष वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. बाळासाहेब ठाकरे हे तमाम मराठी जनतेचे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा समाजावर मोठा प्रभाव आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सांगितले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देशातील प्रमुख महापुरुषांच्या यादीत समाविष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून लोणावळा नगरपरिषद सभागृह व कार्यालयात त्यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, समन्वयक नंदूभाऊ कडू, उपशहर प्रमुख विजय आखाडे, शिवसेना महिला आघाडी शहर संघटिका मनिषा भांगरे, उपशहर संघटिका अनिता गायकवाड, उपशहर संघटिका दिपाली शिरंबेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेच्या या मागणीमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोणावळा शहरात विविध उपक्रम राबविण्याबाबतही चर्चा सुरू झाली असून, नगरपरिषदेच्या निर्णयाकडे शिवसैनिकांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.






















