Breaking news

Impact News l रायवूड भागातील रस्ते खोदाई कामाची नगरपरिषदेने घेतली दखल; बातमी प्रसिद्ध होताच तात्काळ खड्डे बुजवत रस्ता केला पूर्ववत

लोणावळा : रायवूड भागात ऑक्झिलियम काॅन्व्हेंट शाळेच्या समोर मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई करण्यात आली होती. मागील पंधरा दिवसापासून हे काम बंद अवस्थेत होते. याबाबत नगरपरिषदेला अवगत करून देखील कोणतीही कार्यवाही झाली नव्हती याबाबत आज दुपारी मावळ माझा डिजिटल न्यूज वरून याबाबतचे वृत्त फोटोसह प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तातडीने दखल नगर परिषदेने घेतली असून या भागातील सर्व खड्डे बुजवत रस्ता पूर्ववत करण्यात आला आहे. नगरपरिषदेने याबाबत तत्परता दाखवल्यामुळे उद्या सोमवारी सकाळी या भागामध्ये होणारी वाहतूक कोंडीची समस्या व स्कूल व्हॅन चालक तसेच विद्यार्थी व पालक यांची होणारी गैरसोय तात्पुरती टळली आहे. मात्र ऐन पावसाच्या तोंडावर या ठिकाणी रस्त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात खुदाई केल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचणे तसेच चिखल होणे असे प्रकार घडणार आहेत. 

       मावळी पुतळ्यापासून पुढे भुशी धरणाकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर रायवूड या ठिकाणी ऑक्झिलियम काॅन्व्हेंट ही मुलींची शाळा व पुढे रायवूड इंटरनॅशनल ही शाळा आहे. या दोन्ही शाळांमध्ये मिळून साधारण साडेतीन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. असे असताना देखील ऐन पावसाच्या तोंडावर व शाळा सुरू होण्याच्याच वेळेला या ठिकाणी रस्ते खोदायचे काम हाती घेण्यात आले होते व ते काम देखील मागील पंधरा दिवसापासून बंद अवस्थेमध्ये आहे. नगरपरिषदेच्या या अनागोंदी व हलगर्जीपणाच्या कामामुळे शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, पालक व स्कूल व्हॅन चालक तसेच या भागातून दैनंदिन ये जा करणारे स्थानिक नागरिक व पर्यटक या सर्वांनाच याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार होता. सोबतच या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील निर्माण होणार होती. ही बाब मावळ माझा न्युज नाही वृत्ताच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर त्याची तातडीने दखल लोणावळा नगर परिषदेने घेतली असून या भागातील रस्त्यांच्या बाजूने खोदण्यात आलेले खड्डे हे तात्पुरत्या स्वरूपात का होईना बुजवण्यात आले आहेत. सदरचे काम पूर्ण होणार नसेल तर शासनाने या ठिकाणी रस्त्यांवर योग्य प्रकारे डांबरीकरण करावे व पावसाळ्यानंतर सदरचे काम हाती घ्यावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

इतर बातम्या

रायवूड भागामध्ये विकासाच्या नावाखाली रस्ते खोदाई; पंधरा दिवसापासून काम बंद, सोमवारपासून या भागातील शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर