Breaking news

Maval Toll News l सोमाटणे व वरसोली टोल नाक्यावर मावळ तालुक्यातील वाहनांना मिळणार सूट - आमदार सुनील शेळके

लोणावळा : मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील सोमाटणे व वरसोली या दोन्ही टोलनाक्यांवर मावळ तालुक्यातील स्थानिक वाहनांना टोल मधून सूट मिळणार आहे. याकरिता मावळ तालुक्यामधील वाहनधारकांनी आपल्या गाडीचे आरसी बुक व आधार कार्ड यांची झेरॉक्स टोल नाका व्यवस्थापनाकडे जमा करावी अशी माहिती मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी दिली. 

     सोमाटणे व वरसोली या दोन्ही टोलनाक्यांवर स्थानिक वाहनांच्या फास्ट टॅग मधून व गाडीचे नंबर प्लेट स्कॅन करून टोल वसुली केली जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या होत्या. फास्ट टॅग च्या माध्यमातून सुरू असलेली स्थानिकांची ही लूट तात्काळ थांबवा, अन्यथा दहा जून रोजी दोन्ही टोलनाके बंद करण्या संदर्भातील आंदोलन करण्याचा इशारा आमदार सुनील शेळके यांनी दिला होता. यासंदर्भात आय आर बी चे अधिकारी व आमदार सुनील शेळके यांच्यात साधक बाधक चर्चा झाली. त्यामध्ये देहूरोड ते खंडाळा दरम्यान असलेल्या स्थानिक वाहनांना टोल मधून सूट देण्याचे मान्य करण्यात आले आहे. सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी झालेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मावळ तालुक्यामध्ये येत स्थानिक वाहनांना टोल मधून सूट देण्याचे मान्य केले होते. 

     तरीदेखील स्थानिक वाहनांकडून टोल वसुली होत होती. याबाबत आमदारांना स्पष्टीकरण देताना आयआरबी अधिकारी म्हणाले, एम एच 14 नंबरच्या अनेक गाड्या मावळ तालुक्याच्या बाहेरील देखील आहेत. त्यामुळे सरसकट सर्वांना टोलमाफी देता येत नाही. याकरिता मावळ तालुक्यामधील वाहनधारकांनी त्यांच्या वाहनाचे आरसी बुक व आधार कार्ड यांची झेरॉक्स आयआरबी कार्यालयामध्ये जमा करावी जेणेकरून मावळ तालुक्यातील स्थानिक वाहनांचे नंबर हे टोल बूथवर नोंदणी करता येतील व त्या वाहनांना टोल मधून सूट मिळेल, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली. 9 जून ते 30 जून दरम्यान आय आर बी कार्यालयाच्या शेजारी आय आर बी चे विशेष पथक व आमदार सुनील शेळके यांच्या कार्यालयातील सदस्य हे उपस्थित राहून नागरिकांची कागदपत्रे जमा करून घेणार आहेत.


इतर बातम्या