Lonavala Traffic Jam l लोणावळ्यात सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी; पर्यटकांसह सर्वसामान्य लोणावळाकरांना वाहतूक कोंडीचा फटका

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळा, खंडाळा, वलवन, तुंगार्ली, भुशी धरण मार्ग या सर्वच मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा फटका पर्यटकांसह सर्वसामान्य लोणावळाकर नागरिकांना देखील बसला आहे. लोणावळा व वाहतूक कोंडी हे एक समीकरण असले तरी त्याचा जेवढा त्रास हा पर्यटकांना सहन करावा लागतो आहे त्यापेक्षा अधिकचा त्रास हा येथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो आहे.
लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. मात्र शहरात कोठेही वाहन तळासाठी जागा उपलब्ध नसल्याने पर्यटक जेथे जागा दिसेल तेथे वाहने उभी करतात. त्यामुळे कोंडीमध्ये अधिकची भर पडत आहे. गुगल मॅप मुळे अंतर्गत रस्ते देखील पर्यायी मार्ग म्हणून दाखवले जातात. त्यामुळे लहान रस्त्यांवरून देखील पर्यटक वाहने जात असल्याने लहान लहान रस्त्यांवर देखील वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासन यांनी पावसाळी पर्यटनाचे योग्य नियोजन करत वाहतूक कशी सुरळीत राहील याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारची अवजड वाहने लोणावळ्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावर येणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहेत. तसेच पूर्वी पासून ज्या पर्यायी मार्गांचा वापर केला जात होता, त्या मार्गावर दिशा दर्शक फलक लावत पर्यटकांना मार्गदर्शन करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.