मानवतेचा खरा चेहरा असलेल्या अक्षय बोराडे यांच्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अद्वितीय उपक्रमाला लोणावळा टॅक्सी असोसिएशनचा मदतीचा हात

लोणावळा : आपल्या सभोवतालच्या समाजात अनेकदा आपल्याला दुर्लक्षित, उपेक्षित आणि निराधार व्यक्ती आढळतात. परंतु, या व्यक्तींना मायेचा हात देण्याचे काम काही मोजकेच हात निस्वार्थपणे करत असतात. अशाच कार्याची प्रेरणादायी मिसाल म्हणजे जुन्नर येथील शिवऋण प्रतिष्ठान आणि संस्थेचे प्रमुख श्री अक्षय बोराडे.
सध्या बोराडे कुटुंबीयांनी मिळून जवळपास 72 बेघर मनोरुग्ण व निराधार बांधवांना आपल्या स्वतःच्या घरी आसरा दिला आहे. त्यांचा आहार, उपचार, वस्त्र, निवारा यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत त्यांनी मानवतेचे नातं जपले आहे. समाजसेवा म्हणजे केवळ देणगी नव्हे, तर सहभागी होणं आणि सोबत चालणं हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे.
या कार्यात हातभार लावत लोणावळा टॅक्सी असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद, तसेच लोणावळा शहरातील काही उद्योजक मित्र-परिवार यांनी पुढाकार घेऊन किराणा, कपडे, ब्लँकेट्स, बेडशीट्स आणि इतर उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. ही मदत केवळ वस्तूंची नव्हे, तर विश्वासाची आणि आपुलकीची आहे. ही मदत आणि पाठिंबा पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की, समाजामध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे. श्री अक्षय बोराडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हे कार्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.