मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटात आज पुन्हा वाहतुकीचे वाजल्यात तीनतेरा; वाहने नादुरुस्त होत असल्याने चालक हैराण

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटात आज पुन्हा वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. घाट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून रखरखत्या उन्हामध्ये घाट मुंगीच्या पावलाने चढताना अनेक वाहने नादुरुस्त होऊन बंद पडली आहेत. काही वाहने गरम झाली आहेत तर काहींच्या क्लच प्लेटा निकामी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. या वाहतूक कोंडीमुळे एक्सप्रेस वे वरून वाहतूक करणारे वाहन चालक अक्षरशः हैराण झाले आहेत.
वीस वर्षांपूर्वी गतिमान प्रवासासाठी बनवण्यात आलेल्या भारतातील पहिल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वर मागील काही दिवसांपासून शनिवार रविवार व विशेषता सलग सुट्ट्यांच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. खरंतर यापूर्वी देखील पर्यटक मोठ्या संख्येने सुट्ट्यांच्या दिवशी फिरायला जात असत मात्र तेव्हा एवढी वाहतूक कोंडी होत नव्हती. त्यामुळे सध्या होत असलेली वाहतूक कोंडी नेमकी कश्यामुळे होत आहे. की ही कोंडी कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनाांमुळेच ही कोंडी वाढली आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
मागील दोन महिन्यांपासून सातत्याने घाट क्षेत्रामध्ये शनिवार व रविवारी तसेच सुट्टयांच्या दिवसात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. यामुळे कुटुंबाचे व खिश्यांचे आर्थिक नियोजन करत फिरण्यासाठी घराबाहेर पडणार्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना या कोंडीचा सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोंडीत आडकल्याने इंधनाची वाट लागते सोबतच वेळेचे नियोजन करून पर्यटनस्थळांचे नियोजन केलेले असते. ते नियोजन विस्कळीत होते. वाहने गरम होऊ बंद पडल्यास ती सुरु करण्यासाठी फिटर मंडळींना पैसे मोजावे लागतात. तर क्लच प्लेट सारखे नुकसान झाल्यास काही हजार रुपये खर्च होतात. अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याने वाहन चालक नाराजी व संताप व्यक्त करत आहेत. महामार्ग पोलीस व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी यावर योग्य तो मार्ग काढत नागरिकांना वाहतूककोंडीच्या या जीवघेण्या खेळातून दिलासा द्यावा अशी मागणी वाहन चालक करत आहेत.