भुशी धरण लाईन्स पॉईंट कडे जाण्यास पर्यटकांना बंदी; लोणावळा धरणाच्या पायथ्याजवळ चेक पोस्ट

लोणावळा : लोणावळा परिसरामध्ये मागील 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. सहारा पुल, भुशी धरण, लाईन्स पॉईंट या परिसरामध्ये पावसाचा अक्षरशः कहर पाहिला मिळत असल्याने सर्व धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊन वहात आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी व धोका निर्माण होऊ नये याकरिता सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व परिसरामध्ये पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोणावळा धरणाच्या पायथ्याशी लोणावळा पोलिसांनी चेक पोस्ट लावत सर्व पर्यटक वाहने व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मावळ प्रांत अधिकारी यांनी 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
स्थानिक नागरिक व पर्यटक यांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे धोकादायक रित्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच पर्यटन स्थळांवर जाऊ नये असे आवाहन लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे. लोणावळा पोलिसांकडून गवळीवाडा येथील कुमार पोलीस चौकी व सहारा पुणे येथील पोलीस चौकी या ठिकाणाहून पर्यटकांना सुरक्षा बाबतच्या सूचना दिल्या जात आहेत.