Breaking news

वसंत व्याख्यानमाला l शाळा ही माझी दुसरी आई; शाळेने मला घडविले - अभिनेत्री मधुराणी गोखले

लोणावळा : शाळा ही माझी दुसरी आईच आहे, शाळेने मला घडविले असे गौरव उद्गार अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी लोणावळ्यात काढले. लोणावळा शहरामध्ये सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अभिनेत्री मधुराने गोखले प्रभुलकर यांच्या रसाळ संवादाने गुंफण्यात आले. अनघा मोडक यांनी त्यांची वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने खास मुलाखत घेत रसिका श्रोत्यांना आई व शाळा याविषयी सविस्तर माहिती उघडून सांगितली.

     यावेळी बोलताना अभिनेत्री मधुराणी गोखले म्हणाल्या, त्यावेळची शाळा व आजची शाळा यात मोठा फरक आहे. पूर्वी पुस्तक हेच एक माहितीचा सोर्स होता आता एवढे सोर्स आहेत की शाळेचा कनेक्ट संपू लागला आहे. माहितीच्या स्फोटामुळे व विभक्त कुठुंबामुळे आपण एकटे पडू लागलो आहोत. समाजमन जपण्यासाठी मुळे घट ठेवणे गरजेचे आहे. मुले शिकून बाहेर देशात जात आहे. माणुसकीचे शिक्षण देऊन मुलांना आपल्या संस्कृतीशी कनेक्ट ठेवणे गरजेचे आहे. माझ्या आयुष्यात शाळा फार महत्त्वाची होती शाळेमुळेच मी घडले आहे असं त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले.     

      ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या मधुराणी यांची, त्यांच्या जीवनप्रवासाविषयीची सखोल मुलाखत अनघा मोडक यांनी घेतली. अनघा यांची ओघवती शैली आणि मधुराणी यांचे सहज व मोजक्या शब्दात दिलेल्या उत्तरांमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. मुलाखतीदरम्यान, मधुराणी यांनी आजच्या पिढीच्या भावनिक गरजा, कौतुकाचे महत्त्व, तसेच अरुंधतीच्या भूमिके मागचा दृष्टिकोन उलगडून दाखवला. “स्वतःला शाबासकी देत, आनंदी राहणं आवश्यक आहे,” असा संदेश त्यांनी दिला.

      बालपणीचे अनुभव, शालेय व कॉलेजमधील आठवणी, नाटकाचे सुरुवातीचे दिवस आणि मातोश्रींचे संस्कार, या सगळ्या आठवणींना त्यांनी हळुवारपणे उजाळा दिला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी एक तराणा व गाणं सादर केलं. मुलाखतीदरम्यान त्यांनी व अनघा मोडक यांनी मिळून एक सुंदर काव्यजुगलबंदी साकारली. वैभव जोशी, विंदा करंदीकर यांच्यासह अनेक कवींच्या कविता त्यांनी रसिकांसमोर सादर केल्या, ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

      कार्यक्रमाला कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका सुनील शेळके, व्याख्यानमालेच्या अध्यक्षा राधिका भोंडे, विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे, तसेच या वर्षीच्या अध्यक्षा स्वरुपा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री पाटील यांनी, तर परिचय उमा मेहता यांनी करून दिला. आभारप्रदर्शन प्रा. प्रमोद देशपांडे यांनी केले.

इतर बातम्या