Breaking news

लोणावळ्यात छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न; 13 जोडपी विवाहबद्ध

लोणावळा : छत्रपती शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळ्यात भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात 13 जोडपी विवाहबद्ध झाली. पारंपरिक विधींसह आणि हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा गावठाण येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. सकाळी दहा वाजता साखरपुडा सोहळा देखील उत्साहात पार पडला.

      आजच्या महागाईच्या काळात वाढते खर्च, अनावश्यक दिखावा आणि आर्थिक ओझं लक्षात घेता सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज बनली आहे. अनेक कुटुंबांना दिलासा देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. सोहळ्याचे यंदाचे 19 वे वर्ष होते. आतापर्यंत या सोहळ्यात 278 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.

     या कार्यक्रमात सामुदायिक विवाह सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गवळी, विश्वस्त रमेश सिंह व्यास, गुलाबराव मराठे, गिरीधर पाटणकर, नरेश खोंडगे, गिरीश कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वधू-वरांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होते. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाने सर्वसामान्यांना दिलासा देत एक सामाजिक संदेश दिला आहे की विवाह सोहळे साधेपणाने आणि एकोप्याने करत लग्न सोहळ्यावर होणारे आर्थिक भार कमी व्हावा.

      सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वधू वरांना लग्न, साखरपुडा व हळदी समारंभ यासाठीचे पूर्ण पोषक, वधूसाठी सोन्याचे मनी मंगळसूत्र, मुंडावळ्या, घड्याळ, चप्पल, वरासाठी फेटा, घड्याळ, संसार उपयोगी भांडी, कपाट, टीव्ही, फ्रिज, मिक्सर, आदी साहित्य सोहळा समितीच्या वतीने देण्यात आले. तसेच लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींचे जेवण, वधू व वर यांची मिरवणूक हा सर्व खर्च समितीच्या वतीने करण्यात आला.

इतर बातम्या