Breaking news

Lonavala News l भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्यातून पाच पर्यटक धरणात वाहून गेले; 3 मृतदेह शोधण्यात यश

लोणावळा : भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून 4 पर्यटक मुले व 1 महिला असे पाच जण भुशी धरणात वाहून गेले आहे. आज 30 जून रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यापैकी दोन जनाचे मृतदेह 4 वाजण्याच्या सुमारास धरणातून बाहेर काढण्यात आले तर एक मृतदेह 6 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला आहे. या पर्यटकांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू पथकाच्या मदतीने सुरु आहे.

      नूर शाहिस्ता लियाकत अन्सारी (वय 37), अमिमा आदिल अन्सारी (वय 13 वर्ष), मारिया अकिल सय्यद अन्सारी (वय 7 वर्ष), हुमेदा आदिल अन्सारी (वय 6 वर्ष), अदनान सबाहत अन्सारी (वय 4 वर्ष, सर्वजण राहणार सय्यदनगर, हडपसर पुणे) हे पाच जण पाण्यात वाहून गेले आहेत. यापैकी नुर शहीस्ता अन्सारी व अमिमा आदिल अन्सारी व हुमेदा आदिल अन्सारी या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.

    लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसर वानवडी सय्यदनगर येथील लियाकत अन्सारी व युनूस खान परिवारातील 17 ते 18 जण लोणावळा परिसरात वर्षा विहारासाठी आले होते. भुशी धरणाच्या पूर्वेकडील बाजूला असलेल्या रेल्वे विश्राम गृहाच्या मागील बाजूने डोंगरातून एक पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येतो. या प्रवाहात सदरची मुले व इतर असे 10 जण खेळत होते. लोणावळा भागात आज सकाळपासून पावसाचा जोर जास्त असल्याने प्रवाहातील पाण्याचा वेग वाढत होता. पाण्यात खेळत असल्याने व वरून पाऊस पडत असल्याने मुलांना व इतरांना पाण्याच्या वेगाचा अंदाज आला नाही व ते पाण्याच्या प्रवाहात आडकले. मात्र नंतर पाण्याच्या प्रवाहसोबत ते वाहून गेले, त्यापैकी 5 जण सुरक्षित बाहेर निघाले व अन्य पाच जण वाहून गेले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने व तो धरणाच्या जलाशयात जात असल्याने त्यांना वाचविणे सोबतच्या इतरांना शक्य झाले नाही. धरणात मुले वाहून गेल्याची बातमी धरणावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस जवानांना मिळतच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली सोबतच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना व शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला याबाबत कळवण्यात आले. घटनेचे गांभीर्य ध्यानात घेता रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी जास्त असल्याने अनेक जण रुग्णवाहिकेतून घटनास्थळी पोहचले. लागलीच रोप घेऊन पथकातील तरुण धरणाच्या जलाशयात उतरले व शोध घेण्यास सुरुवात झाली. धरणात पाण्याचा प्रवाह वेगात येत असल्याने बुडालेली मुले किती अंतरापर्यंत गेली असावीत याचा अंदाज बांधत शोध घेण्यात आला. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचा शोध घेण्यात यश आले आहे.  

     लोणावळा परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे.

     लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या सह सर्व पोलीस यंत्रणा व शिवदुर्ग पथक या शोधमोहीम सहभागी झाले आहे. मावळचे तहसीलदार यांनी देखील घटनास्थळावर येऊन अपघाताची माहिती घेतली तसेच वन विभाग व धरण रेल्वेच्या मालकीचे असल्याने रेल्वे विभागाचे अधिकारी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. अतिशय दुःखद अशी ही घटना लोणावळ्यात घडली आहे. धरण भरले त्याच दिवशी ही भयंकर घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पर्यटकांनी पर्यटनस्थळी गेल्यावर अनावश्यक धाडस करत धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन देखील लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले आहे.

शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम, आपदा मित्र व लोणावळा नगर परिषद टीमचे राजेंद्र कडू, मनाली कडू, सचिन गायकवाड सर, आयुष वर्तक, निलेश गराडे, शिवराज गायकवाड, आदित्य पिलाने, अमोल परचंड, आकाश मोरे, मोरेश्वर मांडेकर, मनोहर ढाकोळ, अनिल सुतार, अशोक उंबरे, गौरव कालेकर, महादेव भवर, मयूर दळवी, ओंकार वायकर, विजय साळवे, आनंद गावडे, अनिश गराडे यांनी आजचा रेस्क्यू करत 3 मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.

इतर बातम्या