Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात 30 जून रोजी 60 मिमी पावसाची नोंद तर संपूर्ण जून महिन्यात 662 मिमी पाऊस

लोणावळा (Lonavala) : (Lonavala Rain Information) लोणावळा शहरात रविवारी (30 जून) रोजी 24 तासात 60 मिमी (2.36 इंच) पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शहरात संपूर्ण जून महिन्यात 662 मिमी (26.06 इंच) पाऊस झाला आहे. मागील तीन दिवसांपासून लोणावळ्यात संततधार पाऊस सुरू आहे. आधून मधून जोरदार सरी देखील कोसळत आहे. आयएनएस शिवाजी, लायन्स पॉईंट, भुशी धरणाच्या वरील डोंगर भाग या परिसरात लोणवळ्यापेक्षा जास्त पाऊस होत असल्याने भुशी धरण काल 30 जून रोजी ओव्हर फ्लो झाले आहे. तर डोंगर भागांमधून धबधबे वाहू लागले आहेत. 

        लोणावळा परिसरात काल पासून पावसाच्या सोबत हवा देखील मोठ्या प्रमाणात वहात आहे. यामुळे झाडे व फांद्या पडण्याचा देखील धोका निर्माण झाला आहे. रविवारी झालेल्या पावसात भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहातून पाच पर्यटक भुशी धरणात वाहून गेल्याची दुःखद घटना घडली आहे. त्यापैकी 3 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले असून दोघांचा शोध सुरू आहे. दुसरीकडे कार्ला मावळली दरम्यानचा इंद्रायणी नदीवरील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेल्याने प्रशासनाकडून तो रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नागरिकांना सदापूर व इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

     लोणावळा परिसरात मान्सून सक्रिय झाला असल्याने पुढील किमान दोन महिने तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, वारा पाऊस असेल त्यावेळी झाडांखाली थांबणे टाळावे, नदी नाले, ओढे यामध्ये प्रवाहात जाऊ नये, डोंगर तसेच गड किल्ले परिसरात जाताना रुळलेल्या वाटाचा वापर करावा, पाण्यात उतरू नये अशा मार्गदर्शक सूचना लोणावळा पोलीस व नगर परिषद यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

    

इतर बातम्या