कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या सुनील अण्णांच्या पाठीशी मावळातील कष्टकरी समाज पूर्ण ताकतीने उभा राहणार - बाबा कांबळे
लोणावळा : लोणावळा व मावळ तालुक्यामधील कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या आमदार सुनील अण्णांच्या पाठीशी मावळ तालुक्यातील कष्टकरी समाज टपरी, पथारी, हातगाडी हा व्यवसाय करणारा सर्वसामान्य मतदार पूर्ण ताकतीने उभा राहणार असल्याचे कष्टकरी पंचायतीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले. तसेच कष्टकरी पंचायतीच्या वतीने व टपरी, हातगाडी, पथारी पंचायतीच्या वतीने मावळचे आमदार सुनील शेळके यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला असून सर्व नागरिकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना बहुमताने निवडून देण्यासाठी पुढील पंधरा दिवस काम करायचे असे आव्हान देखील त्यांनी लोणावळा येथे पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी लोणावळा टपरी, पथारी, हातगाडी पंचायत चे अध्यक्ष वसंतराव काळोखे पाटील, कार्याध्यक्ष रमेश म्हाळस्कर, मावळ तालुका अध्यक्ष गणेश चव्हाण, नवनिर्वाचित सदस्य पथविक्रेता समिती अशोक कदम, आकाश परदेशी, निर्मला पांगारे, सुजाता म्हाळसकर, मुस्कान शेख, लक्ष्मण दाभाडे सरदार, ताजुद्दीन शेख, गणेश काळडोके, महादेव जगताप यांच्यासह टपरीधारक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबा कांबळे म्हणाले, मागील अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही कष्टकरी समाजाचे नेतृत्व करत शासनाकडे आमच्या मागण्या मांडत होतो. मात्र आजपर्यंत आमच्या मागण्या कोणी पूर्ण करत नव्हते. महायुती सरकारने आमची दखल घेतली व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कष्टकरी समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. लोणावळा शहरामध्ये कष्टकरी टपरी, पथारी, हातगाडी या व्यवसायिकांना आमदार सुनील शेळके यांनी पाठबळ दिले. नुकतेच लोणावळा शहरामध्ये टपरी पथारी हातगाडी पंचायत यांची निवडणूक पार पडली त्यामध्ये देखील आमचे सर्व सदस्य निवडून आले आहेत. लोणावळा शहर हे महाराष्ट्रातील एकमेव शहर असे आहे की, ज्या ठिकाणी ओला उबेर ही बंद झाली आहे. मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्यासारखे कणखर नेतृत्व या मावळ तालुक्याला लाभले. त्यामुळेच आज कष्टकरी समाजाला न्याय मिळत आहे. आमचा रिक्षा चालक, आमचा टॅक्सी चालक यांना न्याय देण्याची भूमिका स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याची भूमिका ही आमदार सुनील शेळके यांनी घेतली. त्याचमुळे आज या लोणावळा शहरांमधील व मावळ तालुक्यामधील संपूर्ण कष्टकरी समाज हा आमदार सुनील शेळके यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. आम्ही सर्वजण आमच्या सर्व संघटनांच्या वतीने आमदार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा देत असून या पुढील काळामध्ये त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय राहून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रमेश म्हाळसकर म्हणाले ज्यावेळी लोणावळा नगर परिषदेच्या वतीने टपरीधारकांवर कारवाई करत त्यांचे संसार उध्वस्त करण्यात आले. त्यावेळी आमदार सुनील शेळके या कष्टकरी समाजाच्या मागे ठामपणे उभे राहिले. त्यांचे आर्थिक नुकसान आमदार सुनील शेळके यांनी भरून दिले, तसेच पुढील काळामध्ये या कष्टकरी समाजावर अन्याय होऊ नये याकरता त्यांच्या पाठीशी उभे राहिले. लोणावळा शहरांमध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे या समाजाला न्याय देण्याची भूमिका आमदार सुनील शेळके यांनी घेतली. आज आपण देखील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना आपले मत देऊन न्याय देण्याचे भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.