Lonavala Rain Information l घाट माथ्यावर पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज ! लोणावळा शहरामध्ये शनिवारी 24 तासात 110 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पुढील चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. लोणावळा शहरामध्ये शनिवारी 05 जुलै रोजी 24 तासात 110 मिमी (4.33 इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे. जोरदार पाऊस व सोबत हवेचा वेग देखील जास्त असणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लोणावळा शहरामध्ये यावर्षी आज अखेरपर्यंत 2502 मिमी (98.50 इंच) पाऊस झाला आहे. पावसाची निम्मी सरासरी म्हणजेच 100 इंच पाऊस होण्यासाठी केवळ दीड इंच पावसाची आवश्यकता लोणावळा शहरामध्ये आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाज प्रमाणे यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी लोणावळा शहरामध्ये आज अखेरपर्यंत जेमतेम 950 मिमी (37.40 इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी आजपर्यंत 61.10 इंच ज्यादा पाऊस झाला आहे. घाटमाथा परिसरामध्ये पुढील चार दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी ज्या ठिकाणी पाणी साचले आहे अशा सकल भागामध्ये जाण्याचे टाळावे. पावसासोबत हवेचा वेग देखील जास्त असल्यामुळे झाडे पडणे खांब पडणे अशा घटना देखील घडत आहेत तेव्हा नागरिकांनी पावसापासून बचावासाठी झाडाच्या खाली उभे राहणे टाळावे असे देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.