Lonavala Bhushi Dam l लोणावळ्यात जोरदार पावसामुळे भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून वेगाने पाणी वाहत असल्याने पर्यटकांचा हिरमोड

लोणावळा : पावसाळी पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात (Lonavala City) मागील आठवडा भरापासून जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. या पावसामुळे धरणे भरली असून डोंगर भागातून वाहणारे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित होऊन वाहू लागले आहे. पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठिकाण असल्या भूशी धरणाच्या पायऱ्यांवरून (Bhushi Dam Step) वाहणाऱ्या पाण्याचा वेग देखील वाढला असल्याने पायऱ्यांवर बसणे पर्यटकांना रविवारी अवघड झाले होते. पायऱ्यांवरून वेगाने पाणी वाहत असल्याने पर्यटकांना आजुबाजूला उभे राहून वाहनारे पाणी बघत बसावे लागले. काही पर्यटक पायऱ्यांच्या खालील बाजूला वाहणाऱ्या पाण्यात बसून भिजण्याचा आनंद घेत होते. सहारा पुलाच्या समोरील दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने तेथे देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पर्यटनाच्या या गर्दीने भुशी धरण मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी केली होती.
लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर देखील प्रचंड वाहतूक कोंडी (Lonavala Heavy Traffic) झाली होती. दुतर्फा दोन ते तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे किरकोळ अंतरासाठी किमान तासभर वेग लागत असल्याने स्थानिक नागरिक व पर्यटक सर्वच नाराजी व संताप व्यक्त करत होते. वलवण व खंडाळा परिसरात तसेच जुना खंडाळा व रायवुड भागात देखील मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस प्रशासन व स्थानिक स्वयंसेवक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भर पावसात काम करत होते मात्र वाहनांची संख्या मोठी असल्याने लांबच लांब रांगा लागत होत्या.
जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत
लोणावळा घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू असल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कमी होत नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे. पावसाच्या सोबत वारा देखील वेगाने वाहत असल्याने झाडे पडण्याचे प्रकार देखील सतत घडत आहे. पावसापासून संरक्षणासाठी चारचाकी वाहन घेऊन निघाले तर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.