Breaking news

रायगडच्या देवदूतांनी साताऱ्यात जाऊन टाळली आपत्ती; अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमने एलपीजी टँकर अपघातात केली मोलाची मदत

खोपोली (प्रतिनिधी) : जयगड येथून नागपूरच्या दिशेने एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा सातारा जिल्ह्यातील मायणी ते मल्हारपेठ रस्त्यावर मौजे चितळी गावा नजीक दिनांक 24 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान अपघात झाला. रस्त्या शेजारी असलेल्या साईड पट्टी वरून टँकरच्या ट्रेलरची मागील ट्रॉली कलंडली त्यामुळे साधारण 22 टन क्षमतेचा एलपीजी गॅसने भरलेला टँकर शेतात कोसळला. अपघात झाल्याची माहिती वडूज पोलीस स्टेशन अंतर्गत मायणी दूरक्षेत्रातील पोलीस यंत्रणेला कळतात त्यानी घटनास्थळी धाव घेतली. एलपीजी हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने या अपघातात तो लिकेज होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी लागलीच उपाययोजना करण्यास सुरुवात केली. अपघात ग्रस्त टँकरच्या एजन्सी कडून ही बाब अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या धनंजय गीध यांना कळवली गेली आणि त्यांना मदतीसाठी त्या ठिकाणी पोचण्याची विनंती केली. 

      या घटनेची माहिती मिळताच त्यातले गांभिर्य ओळखून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे धनंजय गीध, विजय भोसले आणि हनीफ कर्जीकर हे खोपोलीहून घटनास्थळाकडे सर्व संसाधनांनी लागलीच रवाना झाले. रात्री घटनास्थळी पोहोचून त्यांनी एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला असता त्यांच्या निदर्शनास आले की, टँकर उलटला मात्र सुदैवाने गॅस लिकेज झाला नव्हता. मात्र तो उलटलेला टँकर सरळ करताना आणि पूर्वस्थितीत आणताना लिकेज होण्याची शक्यता गृहीत धरून अत्यंत काळजीपूर्वक हाताळणी करण्याची त्यांनी तयारी केली. रात्रीचा अंधार, पडणारा पाऊस, शेतजमीन, वाहतुकीचा अरुंद रस्ता आणि त्यावर सुरू असलेली वाहतूक इत्यादी बाबी लक्षात घेऊन तो टँकर पूर्वस्थितीत आणण्यासाठी दिवसा उजेडी उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला गेला. 25 जुलै 2022 रोजी सकाळी 8 वा. पासून प्रत्यक्ष अपघातग्रस्त टँकर पूर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. सुरुवातीला जेसीबी मशीनने त्या ठिकाणी कच्चा रस्ता बनवला गेला. एकूण तीन क्रेनच्या माध्यमातून कापडी बेल्टने टँकर उचलण्याची तयारी केली गेली. तत्पूर्वी पोलीस यंत्रणेकडून आजूबाजूच्या लोकवस्तीतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले गेले. अग्निशमन दलाची टीम त्या ठिकाणी सर्व तयारीनीशी सज्ज ठेवली होती. विद्युत प्रवाह वाहून येणाऱ्या सर्व लाईन्स बंद केल्या. त्या ठिकाणी कोणताही ज्वालाग्रही पदार्थ किंवा वस्तू न वापरण्याच्या सूचना दिल्या गेल्या. 

    शेतात उलटलेल्या टँकर मध्ये साधारणता 22 टन एलपीजी गॅस होता, तर त्या टँकरचे वजन 10 ते 12 टन होते. ऑपरेशन सूरू होताच धनंजय गीध यांनी सर्व सेफ्टी व्हॉल्ववर लक्ष ठेवले होते, तर विजय भोसले आणि हनिफ कर्जीकर तीनही क्रेन ऑपरेटर्सना व्यवस्थित सूचना देण्यास सुरुवात केली होती. टप्प्याटप्प्याने अत्यंत काळजीपूर्वकरित्या जवळपास तीन एक तासाच्या प्रयत्नानंतर सदर टँकर पूर्ववत करण्यात सर्व यंत्रणांना यश आले. या प्रकाराने हादरलेल्या सर्वांनी हे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर मोकळा श्वास घेतला. या मार्गावर अशा पद्धतीचा झालेला हा अपघात यापूर्वी कोणीच अनुभवला नव्हता. या घटनाक्रमात किंचितशी चूक किंवा क्षणभराचे दुर्लक्ष जरी झाले असते तर प्रचंड मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या तीनही शिलेदारांनी दाखवलेले धारिष्ट आणि समय सूचकता कौतुकास्पद असल्याची कबुली घटनाक्रम ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला त्या मायणी दूरक्षेत्राच्या पोलीस उप निरीक्षक शीतल पालेकर यांनी दिली. एलपीजी सारखा अत्यंत ज्वलनशील गॅसच्या टँकरचे अपघात हाताळण्याची कामगिरी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीही अनेकदा यशस्वी झाली असल्याने त्याच अनुभवाच्या बळावर केमिकल एक्सपर्ट धनंजय गीध त्यांचे सहकारी विजय भोसले आणि हनीफ कर्जीकर यांचे या कामगिरीबद्दलही सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रायगड जिल्ह्याबाहेर जाऊन अपघात हाताळण्याचे धैर्य आणि प्राथमिकता दाखवल्याबद्दल खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि उप विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यानी देखील टीमचे अभिनंदन केले आहे.

इतर बातम्या