Breaking news

SOMJAI DEVI : वलवण गावाचे ग्रामदैवत सोमजाई देवी

लोणावळा (सारिका राजु तारे) : वलवण गावाच्या उत्तरेला टाटा धरणाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ टेकडीवर सोमजाई देवीचे मंदिर आहे. पुर्वी हा सर्व परिसर जंगलमय होता. देवीचे हे अतिशय प्राचिन ठिकाण असून याचा उल्लेख इतिहासात देखील सापडतो. 

    श्री सोमजाई देवी ही पार्वती देवीचे रुप असून मंदिरामध्ये देवळीच्या आत तांदळा स्वरुपात मुर्ती आहे. मंदिराच्या समोर उंच दिपमाळ असून त्याठिकाणी गजलक्ष्मीची मुर्ती आहे. परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून देवीची ख्याती आहे. याठिकाणी भाविकांना अनेक चांगले अनुभव आले आहेत. नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून हे देवस्थान प्रसिद्ध आहे. गुढीपाडव्याला साजरा होत असलेल्या बापदेवांच्या उत्सवात पालखी मिरवणूकीत बापदेवांसोबत सोमजाई देवीची देखील मिरवणूक काढली जाते. सोमजाईला बापदेवांची बहिण मानतात. 

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून सदर देवस्थानाचा पुजा अर्चेचा मान तारे पाटील परिवाराकडे आहे. तारे पाटील परिवाराची तेरावी पिढी सध्या याठिकाणी पुजा अर्चेचे काम पहात आहे. ऐतिहासिक दस्तांमध्ये सुमारे पावणे दोनशे वर्षापुर्वी येथील पुजा अर्चा खर्चाचा हिशेब सरकार दरबारी दिल्याचे दाखले उपलब्ध आहेत. कै. सोनबा तारे पाटील यांनी अनेक वर्ष याठिकाणी सेवा केली. 

   ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वलवण गावातील हे पुरातन देवालय असल्याचे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. तारे पाटील परिवाराकडून चाळीस वर्षापुर्वी याठिकाणचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील भक्तगण व वलवण गावातील तसेच कामानिमित्त स्थलांतरित झालेले अनेक नागरिक याठिकाणी उत्सव काळात देवीचे दर्शन घेण्यासोबत देवीची ओटी भरण्यासाठी येत असतात. वलवण गावातील युवकांनी श्रमदानातून याठिकाणी वृक्षारोपण मोहिम तसेच स्वच्छता मोहिम राबवत परिसर स्वच्छ केला आहे. यापरिसरात वृक्षारोपण करत परिसराचा अल्हाददायकपणा जपण्यात आला आहे. 

    दसर्‍याच्या दिवशी याठिकाणी सिमोल्लंघन करत आपट्याची पानं (सोनं) लुटलं जातं. तसेच देवीला सोनं वाहत व एकमेकाला सोनं देण्यासाठी ग्रामस्त मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात.

इतर बातम्या