कैवल्यधाम योग संस्थेचे श्री सुबोध तिवारी यांची भारत सरकार आयुष मंत्रायल योग प्रमाणीकरण मंडळावर “योग तज्ञ” म्हणून नियुक्ती

लोणावळा : योग आणि तत्त्वज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या कैवल्यधाम योग संस्थेचे सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांची आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या योग प्रमाणीकरण मंडळावर (Yoga Certification Board – YCB) “योग तज्ञ” या पदावर नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा YCB ही संस्था स्वायत्त रीत्या कार्यरत होईपर्यंत (जे आधी होईल तेव्हापर्यंत) करण्यात आली आहे.
श्री तिवारी हे कैवल्यधाम संस्थेत गेली 29 वर्षे सक्रियपणे कार्यरत असून संस्थेच्या शतकी वाटचालीत त्यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. 1924 साली परमपूज्य स्वामी कुवलयानंद जी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने योगशास्त्राच्या प्रसारात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
संस्थेच्या शताब्दी वर्षात (2023-24) श्री तिवारी यांच्या नेतृत्वाखाली विविध योगविषयक उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू, माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद, माजी सरन्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड, माजी राज्यपाल रमेश बैस, स्वामी निरंजनानंद सरस्वती, नौदलप्रमुख एडमिरल राधाकृष्णन हरिकुमार आणि मावळचे खासदार श्री श्रीरंग बारणे यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवर कैवल्यधाम योग संस्थेला भेट देत कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सुबोध तिवारी यांच्या योग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाची दखल घेत भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ही नियुक्ती केल्याने योगसाधकांत आणि कैवल्यधाम परिवारात आनंदाचे वातावरण आहे.