Breaking news

भारताने पाक व्याप्त काश्मीर भुभाग ताब्यात घ्यावा; पाकिस्तान देणार नसले तर थेट युद्ध पुकारावे - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

लोणावळा : पहेलगाम येथे झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय व गंभीर आहे. आतंकवादी हे पाक व्याप्त काश्मीर मधून भारतात येतात. जो पर्यंत पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे तो पर्यंत या आतंकवादी कारवाया सुरूच राहणार, याकरिता माझी भारत सरकारला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी पाकिस्तानला पाक व्याप्त काश्मीर सोडण्याबाबत सांगावे व देत नसतील तर पाकिस्तानच्या विरोधात थेट युद्ध पुकारावे असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात पहेलगाम हल्ल्यवर प्रतिक्रिया देताना सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले काश्मीर येथील कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन वाढले होते आतापर्यंत साधारण तीन कोटी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आहे. त्यामुळे काश्मीर येथील अर्थकारणाला व स्थानिकांच्या रोजगाराला मोठी चालना मिळाली आहे. त्याचमुळे विधानसभेत देखील मोठे यश प्राप्त झाले होते. या सर्व बाबी पाकिस्तान व आतंकवादी यांना पचनी न पडल्याने त्यांनी पहेलगाम या ठिकाणी आतंकवादी हल्ला करत पर्यटकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. जोपर्यंत पाक व्यक्त काश्मीर भारताच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अशा कारवाया सुरूच राहणार असल्याने या आतंकवादाचा खात्मा करायचा असेल तर पाक व्यक्त काश्मीर ताब्यात घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

     लोणावळा शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी रामदास आठवले लोणावळ्यात आले होते. केंद्रीय न्याय व सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रथमच लोणावळा शहरांमध्ये विविध विकास कामांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन केले होते. लोणावळा शहर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासोबत लोणावळा नगर परिषदेच्या उत्पन्नामध्ये वाढ करणाऱ्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देत हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. लोणावळा शहरांमधील प्रमुख 10 प्रकल्पांची त्यांनी माहिती घेतली त्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे पुढील काळामध्ये बैठका लावत तेथे विषय मार्गी लावण्यासाठी व त्यांना आवश्यक असलेला निधी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले आहे. 

लोणावळा शहरातील महत्त्वाचे प्रकल्प 

  1. इंद्रायणी नदी सुशोभीकरण खोलीकरण व सौंदर्यकरण अंदाजे खर्च 200 कोटी रुपये 
  2. खंडाळा तलावाचे पहिले टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. सुशोभीकरण सौंदर्यीकरण या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधीची आवश्यकता आहे.
  3. गुणवंत तलावाचे सुशोभीकरण त्या ठिकाणी बोटिंग हॉटेलिंग व वॉकवे असे विविध प्रकारची कामे करण्यासाठी साधारण आठ कोटी वीस लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे याकरता केंद्र शासनाने निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
  4. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने पुरंदरे शाळा मैदान या ठिकाणी मंजूर असलेले क्रीडा संकुल उभे करण्यासाठी अंदाजे 60 कोटी रुपये अपेक्षित आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास लोणावळा शहरांमध्ये सुसज्ज असे क्रीडा संकुल उभे करण्यात येईल. 
  5. लोणावळा शहराच्या पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देत लोणावळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ बनवण्यासाठी महत्त्वाचा असलेला रोपवे प्रकल्प व त्यासाठी आवश्यक असलेली राजमाची गार्डनची वनविभागाची जागा मिळावी यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे. सदरच्या प्रकल्पासाठी अंदाजे 300 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. 
  6. लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वलवण ते खंडाळा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी पाठपुरावा व्हावा.
  7. लोणावळा शहरामध्ये रेल्वे विभागाची मोठी जागा असल्याने या ठिकाणी रेल्वेचे संग्रहालय उभारण्यात यावे त्यामुळे लोणावळ्यातील पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 
  8. रेल्वे विभागाच्या मालकीचा असलेला भुशी डॅम याला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा. व या ठिकाणी पर्यटकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत पर्यटन वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न व्हावा. 
  9. लोणावळा नगरपरिषेच्या मालकीच्या असलेल्या तुंगार्ली धरणाच्या मजबती करण्यासाठी साधारणतः 30 ते 35 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे तो निधी मिळाल्यास या धरणाची दुरुस्ती व मजबुती करण्याचे काम करण्यात येईल अशी मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली.
  10.  मुंबई पुणे लोहमार्गावरील लोणावळा हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने या ठिकाणी कोरोनापूर्वी सुरू असलेल्या व थांबत असलेल्या सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा तसेच या ठिकाणी बंद असलेली संगणक खिडकी पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांनी केली आहे.


      या बैठकीसाठी हंगामी मुख्याधिकारी तथा प्रशासक अंकुश जाधव, माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, माजी नगराध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, आरपीआयचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, भाजपा लोणावळा अध्यक्ष अरुण लाड, शिवसेना लोणावळा अध्यक्ष संजय भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अध्यक्ष नासिर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष अध्यक्ष विलास बडेकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, दत्तात्रेय येवले, आरोही तळेगावकर, बाळासाहेब जाधव, ब्रिंदा गणात्रा, धीरूभाई कल्याणजी, यमुनाताई साळवे, मालन बनसोडे, गणेश गायकवाड आदींसह लोणावळा नगरपरिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी रेल्वे अधिकारी वनविभागाचे अधिकारी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या