Lonavala News l लोणावळ्यात ड्रग्सच्या वाढत्या वापरावर नीलमताई गोऱ्हे यांची कारवाईची मागणी; ड्रग्स कोठून येतंय त्याची पाळेमुळे शोधून काढा

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्सचा वापर झपाट्याने वाढला आहे. या धक्कादायक परिस्थितीचा शोध घेण्यासाठी, या ड्रग्सचा स्रोत आणि विक्रीचे जाळे कोणत्या पातळीवर पसरले आहे हे तपासून काढण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
सोमवारी (28 एप्रिल) लोणावळ्यात आयोजित प्रशासनाच्या आढावा बैठकीत, गोऱ्हे यांनी पर्यटन सुरक्षा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, लोणावळा हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे, आणि इथे विविध राज्यांमधून पर्यटक येतात. या पर्यटकांना सुरक्षिततेची हमी देणे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, काही पर्यटक अमली पदार्थांसह येतात, आणि काही भागांत ड्रग्सची विक्री सुरू असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.
गोऱ्हे यांनी सांगितले की, “लोणावळ्यात ड्रग्स कोठून येते, त्याची विक्री कोण करत आहे, आणि त्याची साखळी किती पसरलेली आहे हे शोधून काढावे. हे काम तुळजापुर पोलिसांच्या धर्तीवर केले जावे.” त्याचबरोबर, आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथे अधिक सुरक्षा उपाययोजना राबविण्याची सूचना त्यांनी दिली. तसेच, लोणावळा नगर परिषदेला सुट्टीच्या दिवशीही कार्यालय उघडे ठेवून पर्यटकांना आवश्यक सेवा पुरविण्याचे निर्देश गोऱ्हे यांनी दिले. "शनिवार व रविवार सुट्टी ठेवण्याऐवजी, कमीत कमी एक दिवस कार्यालय चालू ठेवा," असे त्या म्हणाल्या.
यावेळी, गुटखा आणि गुटखा सदृश पदार्थांची विक्री बंद करण्याची मागणी केली, आणि पर्यटक व नागरिकांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. नीलमताई गोऱ्हे यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सोमवारी लोकशाही दिवस आयोजित करण्याची सूचनाही दिली आहे.