Breaking news

पर्यावरण संवर्धन व महिला सबलीकरणाचा संदेश देत 'ती' ने केला 10 हजार किलोमिटरचा सायकल प्रवास

लोणावळा : काही माणसं ही ध्येयवेडी असताना, एखादा विचार डोक्यात आला की तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी झपाटल्यासारखी कामाला लागतात. असाच काहीसा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील प्रणाली चिकटे या 21 वर्षीच्या तरुणीच्या बाबतीत पहायला मिळत आहे.

   यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात पुनवट ह्या लहानश्या गावात राहणारी प्रणाली विठ्ठल चिकटे ही 21 वर्षीय तरुणी गेली 9 महिने सायकल प्रवास करत महाराष्ट्र पादाक्रांत करत आहे. आतापर्यंत तीने 10 हजार 200 किलोमिटरचा प्रवास पुर्ण केला आहे. प्रणाली ही BSW ची पदवी घेतलेली विद्यार्थिनी आहे. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करतात, तिन्हे पर्यावरण व ग्लोबल वार्मींग यांचा अभ्यास केला. भविष्यात माणसाला माणूस म्हणून जगायचे असले तर पर्यावणाचे रक्षण फार महत्वाचे आहे. हा विचार तीच्या डोक्यात आला सोबतच आजच्या काळात महिला कोठेही मागे नाहीत मात्र त्यांचे सबलीकरण होणे फार गरजेचे आहे. समाजाचा महिलाप्रती पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा याकरिता समाजात व्यापक जागृती होणे गरजेचे आहे. हा विचार तीच्या मनात आला व त्याकरिता महाराष्ट्र भ्रमण करत याबाबत जागृती करायची, आलेले चांगले वाईट अनुभव याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून शासनस्तरावर काय करता येऊ शकेल याबाबत चर्चा करावी हा विचार डोक्यात घेऊन 20 आँक्टोबर 2020 रोजी प्रणाली सायकल घेऊन घरातून बाहेर पडली. 

     शेतकरी कुटुंबातील ही कन्या घराबाहेर पडत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे तीचे आई, वडिल व कुटुंबातील इतर सदस्यांनी तीला साथ दिली. खिशामध्ये अवघे 500 रुपये घेऊन बाहेर पडलेली प्रणाली हीने पर्यावरण संदेश देत आतापर्यत विदर्भ, खांन्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असा 10 हजार 200 किमीचा सायकल प्रवास केला. जागोजागी थांबत नागरिकांना भेटत पर्यावरण संवर्धन का गरजेचे आहे. महिला सबलीकरण, सायकल चालविण्याचे फायदे याबाबत जागृती केली. महाराष्ट्रातील नागरिकांनी देखील या कन्येला सहकार्य केले. समाजातील विविध घटकांनी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची, राहण्याची सोय उपलब्ध केली. जेथे शक्य नाही तेथे गावातील मंदिरे, शाळा, अगदी पोलीस स्टेशन याठिकाणी प्रणालीचा मुक्काम झाला. प्रवासात भेटेल त्याला जल साक्षरता, प्लास्टिक बंदी, महिला सबलीकरण, झाडे लावणे व झाडे जगविणे हे का गरजेचे आहे हे ती सांगत गेली. 

   प्रणाली म्हणाली केवळ कागदोपत्री काम न करता शासनाकडून देखील प्रत्यक्षात काम होणे गरजेचे आहे. माझी वसुंधरा हा महाराष्ट्र शासनाचा फार चांगला उपक्रम आहे. काही ठिकाणी या अंतर्गत फार चांगली कामे झाली तर काही ठिकाणी फक्त फोटो पुरती कामे झाली. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आँक्सिजनचे महत्व समजले आहे. मात्र पुरेसा आँक्सिजन हवा असेल चांगला पाऊस हवा असेल तर झाडे लावणे व ती जगविणे फार गरजेचे आहे. शासनाने याबाबत गांर्भियांना विचार करावा. तसेच समाज म्हणून आपण प्रत्येकाने याकरिता जागृत राहून काम करणे गरजेचे असल्याचे विचार प्रणाली चिकटे हीने बोलताना व्यक्त केले.

    लोणावळा सायकल क्लब व मावळ तालुका कबड्डी असोसिएशन, शिवक्रांती कामगार संघटना यांच्या वतीने प्रणाली चा लोणावळ्यात सन्मान करण्यात आला. यावेळी मावळ तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पाळेकर, खजिनदार विशाल विकारी, लोणावळा सायकल क्लबचे भरत भरणे, संतोष अंभोरे, हर्षल क्षिरसागर, रिकी मते, सचिन हारपुडे, अक्षय आंबेकर, शिवक्रांती कामगार संघटनेचे चिटणीस गुलाबराव मराठे, संघटक रोहन आहेर, प्रतिक पाळेकर हे उपस्थित होते.

इतर बातम्या