Breaking news

Lonavala News l ‘डीजे चा आवाज कमी करायला सांगितला’ म्हणून करंडोली गावात 6 जणांवर जीवघेणा हल्ला

लोणावळा (Lonavala) : लग्नाच्या वरातीमध्ये लावलेल्या डीजे चा आवाज कमी करा असे सांगितले, म्हणून 12 जणांनी करंडोली गावात सहा जणांवर कोयता, लोखंडी रॉड व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये दोघांना डोक्यात गंभीर मार लागला असून त्यांच्यावर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्यांपैकी 11 जणांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

     याप्रकरणी प्रवीण बाळू चांदणे (वय 28, रा. करंडोली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 12 जणांच्या विरोधात भादवी कायदा कलम 326, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रवीण चांदणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 6 जून रोजी रात्री त्यांच्या घरासमोर असलेल्या सोमनाथ सुनील भाटवडेकर यांच्या लग्नाची वरात असल्याने मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आला होता. प्रवीण यांचा मुलगा लहान असून त्याला ह्दयाचा त्रास असल्याने त्यांनी सुनिल वासुदेव भाटवडेकर यांना डीजेचा आवाज कमी करा माझ्या मुलाला त्रास होत आहे असे सांगितले. त्याचा राग मनात धरून डीजेच्या समोर नाचणारे अनंता साधु केदारी, निलेश अनंता केदारी, नरेश अनंता केदारी, सुरेश अनंता केदारी, दत्ता मारूती केदारी, अक्षय दत्ता केदारी, ओमकार दत्ता केदारी, विलास बबन गायखे, सुनिल वासुदेव भाटवडेकर, सोमनाथ सुनिल भाटवडेकर, नितीन गोंविद केदारी, सुरेश धोंडू केदारी (सर्व राहणार करंडोली, ता. मावळ) यांनी बेकायदेशिर जमाव जमवत अमोल कांताराम शेलार यांच्यावर कोयता व लोखंडी रॉड ने जीवघेणा हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला किरण किसन चांदणे याच्यावर देखील कोयत्याने वार करण्यात आले. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेले राहुल किसन चांदणे, निखील किसन चांदणे, बाळु दामु शेलार व बेबीबाई कांताराम शेलार यांना देखील लाकडी काठयांनी तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. या मारहाणीनंतर वरील सर्वांनी गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात अमोल शेलार व किरण चांदणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

    लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक भारत भोसले हे घटनेचा तपास करत आहेत.

इतर बातम्या