Breaking news

Lonavala Crime News l लोणावळ्यात 23 वर्षीय विवाहितेचा मृत्यू; चार जणांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळ्यात शुक्रवारी (24 मे) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका 23 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला असून याप्रकरणी मयत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या सासरच्या लोकांवर हुंडाबळीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांना आज वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली.

      अनया अर्थव कांबळे (वय 23) असे या मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील संजय चंद्रकांत क्षीरसागर (रा. दावडी, खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत विवाहितेचा नवरा अर्थव महेश कांबळे, महेश कांबळे, वैशाली महेश कांबळे व साक्षी महेश कांबळे (सर्व राहणार महाडा कॉलनी, लोणावळा) यांच्या विरोधात हुंडाबळी सह अन्य कलमान्वये लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील पाच ते सहा महिन्यांपूर्वी अनया व अर्थव यांचे लग्न झाले होते. तिच्या सासरचे लोक तिला सतत कपड्यांवरून व बोलण्यावरून टोमणे मारत तसेच लग्नामध्ये मानपान योग्य प्रकारे केला नसल्याच्या कारणावरून व लग्नात पाहीजे तेवढा हुंडा दिला नाही, आजुन हुंडा आई वडीलाकडून घेऊन ये, असे म्हणत मुलगी अनयाला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचे. त्यांनी तिचा सतत जाच व छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याची फिर्याद मयत मुलीच्या वडिलांनी दिली आहे. या फिर्यादीवरून मयत विवाहितेच्या सासरच्या लोकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून घटनेचा पंचनामा नायब तहसीलदार यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आला आहे. या घटनेनंतर काही काळ लोणावळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

     सदर घटनेचा तपास लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षण सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील पोवार हे करत आहेत.

इतर बातम्या