Breaking news

वसंत व्याख्यानमाला | लोणावळ्यात 21 एप्रिल पासून वसंत व्याख्यान मालेचे आयोजन; लोणावळेकरांना मिळणार सात दिवस बौद्धिक मेजवानी

लोणावळा : वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 21 एप्रिल पासून लोणावळा भांगरवाडी येथील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या प्रांगणात ही व्याख्यानमाला सायंकाळी 6 ते रात्री 8.30 या वेळेमध्ये होणार आहे. यावर्षी व्याख्यानमालेमध्ये विविध नामांकित वक्ते आपले विचार व्यक्त करत लोणावळेकर नागरिकांना बौद्धिक मेजवानी देणार आहेत. तरी लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांनी या व्याख्यानमालेला हजेरी लावत विविध मान्यवरांचे मौलिक विचार ऐकावेत व आत्मसात करावेत असे आवाहन वसंत व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा राधिका भोंडे व या वर्षाच्या कार्यकारिणी अध्यक्षा चित्रा जोशी यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. 2003 सालापासून लोणावळा शहरामध्ये वसंत व्याख्यानमाला अविरतपणे सुरू आहे. 

     यावर्षी वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प 21 एप्रिल रोजी परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव हे गुंफणार असून कारगिल युद्ध आणि मी या विषयावर ते स्वतःचे अनुभव कथन करणार आहेत. नेव्ही बँडच्या सहाय्याने त्यांचे स्वागत या ठिकाणी करण्यात येणार असून लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांनी योगेंद्र सिंह यांचे आत्मकथन ऐकण्यासाठी आवश्यक उपस्थित राहावे अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी श्यामची आई आजही हवी आहे. या विषयावर श्यामची आई या नविन सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री गौरी देशपांडे व शर्व गाडगीळ, सुनील सुकथनकर, सुजय डहाके, सौरभ चांदेकर यांची प्रकट मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाट हे घेणार आहेत. लहान मुलांसाठी हा अतिशय उत्तम संवाद असणार असल्याने शाळकरी मुलांनी याचा आवर्जून लाभ घ्यावा. 23 एप्रिल रोजी पानिपतकार विश्वास पाटील लिखित पानिपत ते महासंग्राम मी आणि माझ्या कादंबऱ्या या विषयावर व्याख्यान होणार आहे. 24 एप्रिल रोजी अरुणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा या पुस्तकावर आधारित अभिवाचन नृत्य आणि मुक्त चर्चेतून मांडणी सुप्रसिद्ध नर्तिका अर्चना अनुराधा व स्नेहल दामले या करणार आहेत. 25 एप्रिल रोजी हमीद दाभोळकर हे मनाचे आरोग्य स्वतःचे आणि समाजाचे या विषयावर व्याख्यान देणार आहेत. 26 एप्रिल रोजी संस्कृत या विषयावर प्रचंड प्रभुत्व असणाऱ्या प्रा. गौरी माहुलीकर या कालिदासांच्या सहा नायिका उलगडून सांगणार आहेत. 27 एप्रिल रोजी महानायक अमिताभ बच्चन यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम स्वरानंद कोल्हापूर व कराड येथील गायकांकडून सादर केला जाणार आहे. 

     व्याख्यानमालेच्या माध्यमातून व्याख्यानांसोबत विविध मान्यवरांचे स्व अनुभव व विविध विषयांना हात घालण्याचा प्रयत्न समितीच्या वतीने करण्यात आला आहे‌. अतिशय उत्तम दर्जाचे वक्ते या व्याख्यानमालेमध्ये आपले विचार प्रकट करणार आहेत. तरी लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांनी या व्याख्यानमालेचा आनंद घ्यावा व सर्व व्याख्यानांना 7 ही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

इतर बातम्या