Breaking news

Lonavala Ganesh Festival : गणेश उत्सवानिमित्त लोणावळ्यात उभं राहतंय भव्य बालाजी मंदिर व काशी विश्वनाथ मंदिर

लोणावळा : गणेश उत्सव काळामध्ये भव्य दिव्य देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या लोणावळा शहरांमध्ये यावर्षी श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने पुरंदरे शाळा मैदानावर भव्य स्वरूपात तिरुपती येथील बालाजी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देखाव्याची लांबी 120 फुट, रुंदी 60 फुट व उंची 85 फुट असणार आहे. तर दुसरीकडे श्रीमंत नेहरू मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने लोणावळा नगरपरिषद शाळा क्रमांक 1 समोर सॉ मिलच्या जागेत यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर उभारले जात आहे. या मंदिराचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. सुमारे 45 फूट उंचीचे असे हे सुवर्ण मुलामा असणारे मंदिर असणार आहे.

   लोणावळा शहरामध्ये 51 सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणारी मंडळी आहेत. यापैकी जवळपास 23 मंडळी ही दहा दिवसांचे बाप्पा बसवितात व त्यांचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढत विसर्जन केले जाते. गणपती बाप्पांचे आगमन मंगळवारी होणार असल्याने सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे. सर्व मंडळांकडून याकरिता मंडप उभारणी, स्वागत कमानी लावणे, विद्युत डेकोरेशन आधी कामे सुरू आहेत. लोणावळा शहरांमध्ये मोठ्या जल्लोषात व उत्साहामध्ये गणेश उत्सवाचा सण साजरा केला जात असल्याने लोणावळा बाजारपेठे डेकोरेशन सहित्यांनी गजबजला आहे. बाजारपेठेत एक वेगळा उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी पावसाचा जोर काहीसा कमी असल्याने तसेच मागील दोन ते तीन वर्ष कोरोनामुळे गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला असल्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव लोणावळा शहरात अतिशय जल्लोषात साजरा होत आहे.

      लोणावळा शहरातील गणेश उत्सवाला 98 वर्षांची परंपरा आहे. येथील मानाच्या पहिल्या मंडळाचे यंदाचे 98 वे वर्ष आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व ठरवून दिलेल्या क्रमांका नुसार गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक लोणावळा शहरात काढली जाते. लोणावळा हे एकमेव शहर असे आहे की, या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला नंबर वरून कोठेही वाद होत नाहीत. सर्व जाती धर्माचे लोक या मिरवणुकीमध्ये गावचा उत्सव म्हणून सहभागी होत असतात. पोलीस प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वीच सर्व गणेश मंडळांची आढावा बैठक घेत त्यांना गणेश उत्सव काळामध्ये पाळावयाचे नियम व महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वांनी हा उत्सव शांततेमध्ये व आनंदात साजरा करावा, पोलीस प्रशासन देखील याकरिता सज्ज झाले असून सर्व गणेश मंडळांनी नियम पाळत दर्जेदार पद्धतीने गणेश उत्सव साजरा करावा असे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उत्सव काळामध्ये शहरांमध्ये कोठेही वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता वीज वितरण कार्यालय घेत असून बाप्पांचे आगमन व विसर्जन निर्विघ्नपणे व्हावे याकरिता लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून घेण्याचे काम सुरू असून ज्या ज्या ठिकाणी विसर्जन होते. त्या ठिकाणांची स्वच्छता करण्याचे काम संबंधित विभागाला देण्यात आले आहे.

इतर बातम्या