Breaking news

Lonavala - नशामुक्ती मॅरेथॉन : हम तो भागेंगे मगर नशा को भी भगायेंगे - सुनिल शेट्टी

लोणावळा : "हम तो भागेंगे मगर नशा को भी भगायेंगे" असा संकल्प करा असे सांगत प्रसिद्ध अभिनेते सुनिल शेट्टी यांनी पुणे ग्रामीण पोलीस आयोजित नशामुक्ती मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविला. पाच किमी अंतराच्या मॅरेथॉनला नागरिकांनी, तरुण तरुणी व विद्यार्थी वर्गाने मोठा प्रतिसाद दिला. रायवुड येथील बोहरी मैदान ते नौसेगे बाग, इंद्रायणी नदी पुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयचंद चौक, मावळा पुतळा चौक व आँक्झिलियम शाळेसमोरुन पुन्हा बोहरी मैदान अशा मार्ग मॅरेथॉनसाठी बनविण्यात आला होता. यामध्ये 17 ते 25 वयोगट (मुले) या गटात सुनिल सौरव, रोशन सिंग व अतुल कृष्णा यांनी क्रमांक मिळविले. 17 ते 25 वयोगट (मुली) या गटात स्वप्नाली पावसकर, ममता चितकला, आयोध्या खोसे यांनी क्रमांक मिळविले. 25 वर्षावरील गट (मुले) - आर.एस. कुमार, रमेश गोळे व संतोष वाडेकर यांनी क्रमांक मिळविले. तर मुलींच्या गटात डाॅ. प्रियंका जियाल, मनिषा बनसोडे व जया शिंगणापुरे यांनी क्रमांक मिळविला. 17 वर्षाखालील गटात (मुले) - आयुष रुखमोडे, निरज साळवे व विनोद पसेरा यांनी तर (मुली) गट‍ात - भावना माळी, यशश्री शेलार व परिनोत तोमर यांनी क्रमांक मिळविले. सहभागी स्पर्धकांमधून चार लकी ड्राॅ काढत त्यांना सायकली भेट देण्यात आल्या तर सर्व सहभागी स्पर्धकांना बाॅडी फस्ट च्या वतीने गिफ्ट देण्यात आले.

     मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते सुनिल शेट्टी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डाॅ. अंकित गोयल, उप अधीक्षक मितेश घट्टे, आयएनएस शिवाजीचे कॅप्टन सुधाकर, एअरफोर्सचे कमांडिंग ऑफिसर चौधर, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या हस्ते झेंडा दाखवत करण्यात आले.

    यावेळी बोलताना अभिनेते सुनिल शेट्टी म्हणाले, नशा ही समाजातील सर्वात मोठी समस्या आहे. नशा ही फक्त ड्रग्जची नाही तर विविध प्रकारची असते. कोणतीही नशा ही घातक असल्याने नशे पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कोणी नशा करत असले तर दोष देण्याऐवजी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. कोणाला जेल मध्ये टाकून किंवा गुन्हा दाखल करुन ही समस्या सुटणार नाही, त्याला नशेतून मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारे म्हणाले, समाजाला नशामुक्त तसेच गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी व जनतेला जेवढे शक्य आहे तेवढे चांगले देण्याचा पोलीस दलाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी वाईट नशा सोडत चांगल्या सवयीची नशा करावी असे मत व्यक्त केले. पोलीस अधीक्षक डाॅ. अंकित गोयल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर पोलीस उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती मॅरेथॉन आयोजित करण्यामागील पार्श्वभूमी विषद केली.

इतर बातम्या