Lonavala News l लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी
लोणावळा : लोणावळा शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने व लोणावळा नगरपरिषदेने एकत्रित प्रयत्न करत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज लोणावळा शहर चे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना तसेच लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व मुख्याधिकारी अशोक साबळे यांना निवेदन देण्यात आले आहेत. लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते. तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागासाठी ही एक मोठी व महत्त्वाची बाजारपेठ असल्यामुळे स्थानिक नागरिकांची देखील सातत्याने बाजारपेठेमध्ये वर्दळ राहते. असे असताना लोणावळा शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. नागरिकांना पायी चालणे देखील अवघड होऊन बसले असून वाहने उभी करण्यासाठी शहरात कोठेही वाहन तळ अथवा मोकळी जागा उपलब्ध राहिलेली नाही.
याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख म्हणाले, मागील वर्षी लोणावळा शहरामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल व आमदार सुनील शेळके यांची आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये पुढील तीन महिन्यांमध्ये लोणावळा शहरातील वाहतुकीची समस्या सोडवली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. वाहतूक नियंत्रणासाठी 50 वॉर्डन देण्याचे देखील यावेळी घोषित करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र एक वर्ष झाले तरी ना वाहतूक कोंडीची समस्या सुटली ना वॉर्डन लोणावळा शहरामध्ये आले, केवळ बोलाची कढी व बोलाचा भात अशीच परिस्थिती या आढावा बैठकीची झाली आहे.
लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी जिल्हा अधीक्षकांनी शब्द दिल्याप्रमाणे शहरात ट्राफिक ब्रांच सुरू करण्यात यावी. शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा. शहरातील प्रमुख चौक बाजारपेठ परिसर व जुन्या मुंबई पुणे महामार्गावर विशेष वाहतूक नियोजन राबविण्यात यावे. बेकायदेशीर रित्या रस्त्यावर कोठेही वाहने उभे करणाऱ्या चालकांवर व वाहनांवर कारवाई करण्यात यावी. पावसाळी हंगाम लक्षात घेता वाहतूक नियोजनासाठी जादाचा बंदोबस्त नेमण्यात यावा, अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वॉर्डन भरती करण्यात यावी
लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी लोणावळा शहरामध्ये 50 ट्रॅफिक वर्णन मंजूर करण्यात आले असून त्याबाबतची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे असे वारंवार सांगितले जात आहे मात्र प्रत्यक्षात ते कृतीमध्ये येत नाही अशी खंत नासिर शेख यांनी व्यक्त केली आहे. लोणावळा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर ट्राफिक वार्डांची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, ज्येष्ठ नेते रमेश दळवी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल रजपूत, विद्यार्थी अध्यक्ष अभय परदेशी, सुधीर कदम, प्रवीण करकरा हे उपस्थित होते.





















