जातीय सलोख्याचे दर्शन : लोणावळा शहरातील मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद चा जुलूस अनंत चतुर्दशीला न काढता एक ऑक्टोबर रोजी काढणार

लोणावळा : सामाजिक सलोखा राखत सर्व धर्माचे सण उत्सव लोणावळा शहरांमध्ये अतिशय उत्साहामध्ये व सर्वांच्या सहभागातून साजरे केले जातात. राज्यामध्ये किंवा देशांमध्ये कोणतीही जातीय घटना घडली तरी लोणावळा शहरातील सर्व धर्मीय हे एकजुटीने राहून जातीय सलोखा कायम ठेवत असतात. यावर्षी हिंदू समाजाचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेश उत्सव काळा मधील शेवटचा दिवस असलेल्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा सण योगायोगाने आला आहे. दरवर्षी मुस्लिम बांधव ईद-ए-मिलाद याचा जुलूस अतिशय जल्लोषात व उत्साह पूर्ण वातावरणामध्ये काढत असतात. मात्र यावर्षी हा दिवस अनंत चतुर्दशीच्या दिवशी आला असल्याने व त्या दिवशी लोणावळा शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक होणार असल्याने लोणावळा शहरातील सून्नी मुस्लिम बांधवांकडून जातीय सलोखा राखत अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणारा ईद-ए-मिलाद चा जुलूस हा पुढे ढकलत एक ऑक्टोबर रोजी ही मिरवणूक काढणार असल्याचे नासिर शेख यांनी लोणावळा गणेशोत्सव आढावा बैठकीमध्ये सांगितले.
सुन्नी मुस्लिम जमातचे पदाधिकारी दरवर्षी गणेश उत्सवात सहभागी होत विसर्जन मिरवणूक काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित असतात. आज लोणावळा शहरांमध्ये पार पडलेल्या गणेश उत्सव आढावा बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपला निर्णय लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, मुख्याधिकारी पंडित पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व उपस्थित सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमोर सांगितला. सर्व उपस्थित नागरिकांनी व मान्यवरांनी या निर्णयांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. मुस्लिम समाजाच्या वतीने यावेळी उपस्थित सर्व हिंदू बांधवांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.