Lonavala News : इंडियन स्वच्छता लीग 2 मध्ये लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून 1 हजारांहून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांचा सहभाग

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेने इंडियन स्वच्छता लीग सिझन 2 मध्ये लोणावळा स्वच्छता लेजेंड या नावाने सहभाग घेतला आहे. लोणावळा नगरपरिषद यांचे मार्फत आज शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या भुशी धरणाकडे जाणाऱ्या सहारा ब्रिज येथे स्वच्छता मोहीम व विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी लोणावळा स्वच्छता लेजेंड या टीमचे कॅप्टन म्हणून काम पहिले. लोणावळा शहरातील सर्व शाळा, सामाजिक संस्था, नागरिक, व्यावसायिक असे एकूण 1000 पेक्षा जास्त व्यक्तींनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या मोहिमेत सर्वप्रथम जनजागृती करिता लोणावळा माध्यमिक व लोणावळा उर्दू हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी सुंदर असे पथनाट्य सदर केले. तसेच लोणावळा माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत का इरादा या गाण्यावर नृत्य सादर करत सर्वांची मने जिंकली. शिक्षकांनी स्वच्छतेवरील कविता सादर केल्या. डॉन बाॅस्को हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या ढोल पथकाने सर्वाना मंत्रमुग्ध केले. महालक्ष्मी महिला मंच मार्फत सुंदर असे पथनाट्य करण्यात आले. जनजागृती कार्यक्रमानंतर माझी वसुंधरेची हरित शपथ व स्वच्छता शपथ घेऊन स्वच्छता मोहिमेस व प्लॉग रन ला सुरवात झाली.
यामध्ये सर्वजण हे स्वच्छतेवर घोषणा देत कचरा गोळा करत सर्व पर्यटकांना स्वच्छतेचे महत्व सांगत होते. भुशी गाव येथे स्वच्छ लोणावळा सुंदर लोणावळा हरित लोणावळा या जयघोषात हा कार्यक्रम संपन्न झाला. लोणावळा नगरपरिषद मार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ट्राफिक वार्डन मार्फत ट्राफिक वळविण्याची व्यवस्था, फिरते शौचालय, मेडिकल स्टाफ व रुग्णवाहिकेचे सोय सर्वासाठी केली होती. या कार्यक्रमात लोणावळा शहरातील सर्व शाळा, नागरिक, सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार, व्यवसायिक यांनी सहभाग घेतला होता.
लोणावळा शहरचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व मागील वर्षी इंडियन स्वच्छता लीग 1 मध्ये लोणावळा शहराने प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. तसाच यावर्षी आपण सिझन 2 मध्येही प्रथम क्रमांक मिळवू असा विश्वास व्यक्त केला. लोणावळा शहर स्वच्छ सुंदर व हरित ठेवू असे आश्वासन सर्वांकडून घेतले. लोणावळा प्राथमिक विद्यालय खंडाळा यांच्या सुंदर अशा पथनाट्याने या स्वच्छता मोहीमेची सांगता झाली. ह्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्या ठिकाणचा कचरा गोळा करुन संपूर्ण परीसर स्वच्छ केला.