Breaking news

लोणावळा नगरपरिषदेच्या पाणी खात्यात ठेकेदाराची मनमानी; परस्पर विकले होते पाईप - भाजपाकडून चौकशीची मागणी

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदमधील पाणी खात्यात सध्या अनागोंदी कारभार चालू असून ठेकेदाराची पाणी खात्यात मनमानी चालू आहे. 32 कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन देखील लोणावळा शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत आहे. पाणीपुरवठा यंत्रणेत सातत्याने तांत्रिक बिघाड होत असून 2 ते 3 दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही. मुबलक पाणी उपलब्ध असून देखील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने ही कृत्रिम टंचाई का निर्माण होत आहे याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लोणावळकरांच्या वाटयाला हे भोग येणार असतील तर त्याची जबाबदारी प्रशासनाची नाही काय? असा सवाल करीत भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी पाणी खात्यातील कारभाराबाबत चौकशी करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

    बाळासाहेब जाधव यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ठेकेदारावर अनेक आरोप केले आहे. लोणावळा शहरात सध्या काही ठिकाणी पुलांचे रुंदीकरणाचे काम चालू आहे त्याठिकाणीचे पाणीपुरवठा योजनेचे जलवाहिणी शिफ्ट करून नवीन जागी बसवण्याचे काम चालू आहे. त्यातील जुने पाईप हे संबंधित ठेकेदाराने परस्पर विक्री केले आहे. वास्तविक सदर जुने पाईप हे नगरपरिषद भांडार विभागात जमा करणे बंधनकारक असतानाही ठेकेदाराने ही चूक केली असून त्यावर गदारोळ झाल्यावर सदर पाईप पुन्हा पालिकेकडे जमा केल्याचं बाळासाहेब यांनी म्हंटलं आहे. 

     नगरपरिषदेचा वार्षिक पाणीपुरवठा विभागाचा ठेकेदार व पाईप शिफ्टींग करणारा ठेकेदार हा एकच असून दोन्ही ठिकाणी त्याची तीच माणसे काम करत आहे. सदर बाब म्हणजे नगरपरिषद व पर्यायाने जनतेच्या पैशाची लूट करण्याचा प्रकार आहे. सदर ठेकेदाराच्या ठेक्यात ही बऱ्याच त्रुटी असून तो नगरपरिषद स्वतःच्या मालकीची असल्या सारखा वागत आहे. तो अधिकारी वर्गाचे सुध्दा आदेश मानत नाही तरी त्याचे कामाचे बिल अगदी वेळेवर निघते यामागे काय गौडबांगल आहे असा प्रश्न बाळासाहेब जाधव यांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाळासाहेब जाधव यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पंडित पाटील यांची भेट घेतली असता, मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी वरील सर्व आरोपाची चौकशी करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले आहे. 

सुरैय्या रोड व नांगरगाव येथील पुलावरील पाईल लाईन शिफ्ट करताना त्या पुलांचे रेलिंग देखील काढत ते दोन्ही पुल धोकादायक करण्यात आले आहेत. सदर पुलांची कामे पावसाळ्यानंतर होणार असल्याने पावसाळ्यात या पुलांवरून वाहने अथवा नागरिक नदीपात्रात पडण्याचा धोका निर्माण झाला असल्याने तात्काळ दोन्ही पुलांचे काढलेले सुरक्षा रेलिंग परत लावण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

इतर बातम्या