Breaking news

Lonavala Swimming Pool : लोणावळ्यातील स्विमिंगपूल चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; पाच महिन्यात तीन जणांचा मृत्यू

लोणावळा : लोणावळा शहरातील खाजगी बंगल्यांमध्ये असणार्‍या स्विमिंगपूल चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रविवारी प्रिछली हील भागातील एका बंगल्यात टेरेसवर असलेल्या स्विमिंगपूल मध्ये बुडून एका दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. मागील पाच महिन्यातील ही अपघाताची तिसरी घटना आहे. जुलै महिन्यात 13 जुलै रोजी अशाच प्रकारे एका दोन वर्षीय बालकाचा स्विमिंगपूल मध्ये बुडून मृत्यू झाला होता. तर 29 जुलै रोजी स्विमिंगपूल मध्ये खेळून ओल्या अंगाने बाहेर आलेल्या 13 वर्षीय बालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात लागोपाठ झालेल्या दोन अपघाती घटनांनतर लोणावळा नगरपरिषदेेने खाजगी बंगल्यांमधील स्विमिंगपूल चा सर्व्हे हाती घेतला होता. शहरात जवळपास 997 स्विमिंगपूल असल्याचा अहवाल नगरपरिषदेला प्राप्त झाला होता. यापैकी किती स्विमिंगपूल नगरपरिषदेची परवानगी घेऊन बांधले आहेत व किती बेकायदेशीरपणे बांधले आहेत. याची वर्गवारी करत कारवाई करण्याचा इशारा लोणावळा नगरपरिषदेने पाच महिन्यापूर्वी दिला होता. प्रत्यक्षात मात्र तो इशाराच राहिल्याने अँक्शन मोड मध्ये आलेले प्रशासन पुन्हा डिअँक्टिव झाले व काल पुन्हा एका निष्पाप बाळाचा जीव गमवावा लागला. 

     कालच्या घटनेत कोण दोषी असतील त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेलच मात्र शहराच्या सुनियोजित विकासाचे नियोजन करण्याचे व बांधकाम परवानगी देण्याच्या अधिकार ज्या लोणावळा नगरपरिषदेला आहेत. त्यांचे शहरात सुरु असलेल्या व झालेल्या विकासकामांकडे खरेच लक्ष आहे का? असा साधा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत. पर्यटकांची वाढती संख्या व खाजगी बंगल्यांना मिळत आलेली पसंती यामुळे लोणावळा शहर व आजुबाजुच्या भागात खाजगी बंगले भाड्याने देण्याचे प्रकार वाढले आहेत. व्यावसायासाठी बंगले भाड्याने देणे गैर नसल्याने हा व्यावसाय सध्या तेजीत सुरु आहे. मात्र पर्यटकांच्या मागणीनुसार अनेक बंगल्यांमध्ये स्विमिंगपूल बांधण्यात आले आहेत. हे स्विमिंगपूल बांधत असताना अनेकांनी नगरपरिषदेची परवानगी घेतलेली नाही. काहींनी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत स्विमिंगपूल बांधले असल्याने नगरपरिषद देखील त्याकडे कानाडोळा करते. खरंतर नगरपरिषदेच्या एका कक्षात बसून शहराच्या चारही दिशांना कोठे काय आहे व कसे आहे हे सांगणारे निष्णात अधिकारी व कर्मचारी नगरपरिषदेत असताना देखील बिनबोभाट वाढत असलेली बांधकामे व त्यातही बेकायदेशीरपणे बांधकामे कोणाच्या आर्शिवादाने व कशी वाढतात हे वेगळं सांगायचे कारण नाही. लोणावळ्यात मागील काही दिवसांमध्ये स्विमिंगपूल मध्ये लहान मुले बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पालकांचे मुलांकडे होणारे दुलर्क्ष व बंगल्यांमध्ये सुरक्षेची वाणवा हेच आहे. बंगल्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर पालक मुलांना बिनधास्तपणे मोकळे सोडून देतात. तर संपुर्ण बंगला भाडेतत्त्वावर दिलेला असल्याने बंगल्याचे मालक व चालक यापैकी कोणीही बंगल्यात नसतात, त्यामुळे सुरक्षेकरिता कोणीही नसते. स्विमिंगपूल बांधताना सुरक्षेच्या अनेक मापकांचे उल्लंघन झालेले असते. स्विमिंगपूलला सुरक्षा रेलिंग नसते तसेच कोणीही कर्मचारी उपलब्ध नसतो, यामुळे देखील अपघात घडतात. याविषयी बोलताना मुख्याधिकारी पंडित पाटील म्हणाले, लोणावळ्यातील जवळपास 500 स्विमिंगपूल अनाधिकृत आहे. त्या सर्वांना नोटीसा बजावण्याचे काम सुरु आहे. जे स्विमिंगपूल नियमित करता येणे शक्य आहे ते दंड आकारून नियमित करण्याचा प्रयत्न असून जे नियमित करणे शक्य नाही ते तोडले जाणार आहेत. पोलीस निरीक्षक सिताराम डुबल म्हणाले, लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. खाजगी बंगल्यांमध्ये तसेच हाॅटेल मध्ये येणार्‍या पर्यटकांनी लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. सोबतच बंगले धारकांनी देखील सुरक्षेच्या बाबी पुर्ण करणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होईल, कायदेशीर बाबी तपासल्या जातील मात्र गेलेला जीव परत येणार नाही याकरिता काळजी घेणे गरजेचे आहे. मुख्याधिकारी पाटील यांनी देखील पालक व बंगलेधारक यांनी काळजी घेणे व सुरक्षेच्या सर्व मापकांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पर्यटनाचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात पर्यटकांचे अशा प्रकारे होणारे अपघात हे शहराच्या नावलौकिकाला बाधा पोहचविणारे असल्याने पोलीस यंत्रणा, लोणावळा नगरपरिषद व राजकीय मंडळी तसेच खाजगी बंगले भाडेतत्त्वावर चालविणारे मालक व चालक या सर्वांनी या अपघाती घटना गांभीर्यांने घेणे गरजेचे असून असे अपघाती प्रकार पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

इतर बातम्या