Breaking news

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान बेकायदेशीर दारू सापडल्याने दोन वाहने व दारू असा 21 लाखांचा मुद्देमाल केला जप्त; सोबतच तीन ठिकाणी छापेमारी

लोणावळा : बेकायदेशीर दारू जवळ बाळगल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (25 मार्च) पाच ठिकाणी कारवाई करत 21 लाख 78 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मळवली या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान वाहनांमधून बेकायदेशीरपणे दारू घेऊन जाणाऱ्यां दोन वाहनांवर कारवाई करण्यात आली. याठिकाणी बेकायदेशीर दारू सोबत वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. तसेच बोरज, शिळिंब व वाकसई चाळ याठिकाणी गावठी हात भट्ट्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.

     पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर तसेच नाकाबंदी करुन अंमली पदार्थ तसेच बेकायदेशीर दारु वाहतुक करणारांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे लोणावळा उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यासाठी दुधीवरे खिंड, मळवली, वरसोली टोलनाका, टायगर पॉईंट, पवनानगर जवन फाटा इत्यादी ठिकाणी नाकाबंदीचे पॉइंट नेमून सर्व बीट ऑफिसर व अंमलदार यांना अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे 25 मार्च रोजी होळी व धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने चार स्वतंत्र पथके तयार करुन त्यांना पोलीस स्टेशन हद्दीत विवीध ठिकाणी नाकाबंदी लावून तसेच बीट हद्दीत चोरून अवैध व्यवसाय करणारांवर छापे मारण्याचे आदेश दिले होते.

    यापैकी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार दुर्गा जाधव, पोलीस अंमलदार सुरज गायकवाड, होमगार्ड सागर दळवी, होमगार्ड सागर कुंभार यांच्या पथकाने मळवली येथे नाकाबंदी लावून नाकाबंदी दरम्यान वाहनांची चेकींग सुरु केली. त्यादरम्यान हुंदाई क्रेटा कार नं. (MH 04 LT 2421) मध्ये विदेशी दारु, बीयर व गुन्ह्यात वापरलेली हुंदाई क्रेटा कार असा एकुण 15,10,830/- रुपयाचा माल पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांचे पथकाने जप्त केला. या कारमधील शुभम शशिकांत दिपंकर (वय 21, रा. मुंबई), वेदांत शरद चौधरी (वय 21), प्रणव विजय साळुंखे (वय 21), प्रणव अतुल विभुते (वय 21, तिघेही राहणार पुणे), मोहनीश शंकर मुदलियार (वय 21, रा. अंबरनाथ) यांचे विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अवैधरित्या दारुची वाहतुक केले प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच ठिकाणी नाकाबंदी दरम्यान एक टाटा अल्ट्रॉज कार नं. (MH 12 UW 0448) मध्ये विदेशी दारु, बीयर व गुन्ह्यात वापरलेली अल्ट्रॉज कार असा एकुण 6,54,960/- रुपयाचा माल पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांच्या पथकाने जप्त केला आहे. या कारमधील वैभव चंद्रशेखर लुतडे (वय 30) व इशान विभव कदम (वय 27, दोघेही राहणार पुणे) यांच्या विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अवैधरित्या दारुची वाहतुक केले महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        सहा. पोलीस उपनिरीक्षक अजय दरेकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक पै. महेंद्र वाळुंजकर, महिला पोलीस नाईक रुपाली कोहीणकर यांचे पथकाने बोरज गावाच्या हद्दीत रेल्वे पटरीच्या जवळ चोरून गावठी हातभट्टीची दारु विकणाऱ्या मिनीता राज बीरावत (वय 22 वर्षे रा. बोरज ता. मावळ) या महिलेवर छापा टाकत तिच्या ताब्यातून 9,300/- रुपये किंमतीची 90 लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली असून प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तीच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलीस हवालदार जय पवार, पोलीस हवालदार विजय गाले, होमगार्ड उद्धव सानप, होमगार्ड भिमराव वाळुंज यांचे पथकाने शिळींब गावचे हद्दीत कातकरी वस्ती येथे चोरून गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठीचे रसायन बनविणाऱ्या व गावठी हातभट्टी दारु विक्री करणाऱ्या एकनाथ रामा घोगरे (वय 45 रा. शिळींब ता. मावळ) या इसमावर छापा टाकत त्याच्या ताब्यातून कच्चे रसायन व गावठी हातभट्टीची तयार दारुन असा एकुण 2,200/- रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार विजयकुमार मुंढे, महिला पोलीस हवालदार पुष्पा घुगे, पोलीस अंमलदार सांडभोर, पोलीस अंमलदार कमठणकर, होमगार्ड शंकर खेंगरे यांचे पथकाने मौजे वाकसई गावचे हद्दीत खडी मशीन जवळ चोरून गावठी हातभट्टीची दारु विकणाऱ्या रेखा ऋषी बीरावत (वय 40 वर्षे रा. डोंगरगाव ता. मावळ) या महिलेवर छापा टाकत तिच्या ताब्यातून 1500/- रुपये किंमतीची 15 लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त केली. तीच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      सदर पाच कारवायांमध्ये लोणावळा ग्रामीण पोलीसांनी एकुण 21,78,790/- रुपये किंमतीचा माल जप्त जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.

इतर बातम्या