Lonavala Rain Information : लोणावळ्यात मागील 24 तासात तब्बल 218 मिमी पाऊस

लोणावळा : लोणावळा शहरात मंगळवारी (9 ऑगस्ट) 24 तासात तब्बल 218 मिमी (8.58 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून लोणावळा शहरात पुन्हा सक्रिय झाला आहे. काल दिवसभर व रात्री जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा नदीनाले दुतडी भरून वाहू लागले आहेत. अनेक रस्त्यावर पाणी साचले आहे. पुढील चार ते पाच दिवस पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली असल्याने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. लोणावळा शहरात यावर्षी आजपर्यंत 3408 मिमी (134.17 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजपर्यंत 3372 मिमी (132.67 इंच) पाऊस झाला होता. पावसाच्या सोबत जोरदार हवा देखील सुरु असल्याने नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.