Lonavala News : अनाधिकृत स्विमिंगपूल असणार्या बंगल्यावर कारवाई करा - मा. नगराध्यक्षा सुरेखा जाधव

काय म्हणाले जाधव व पुजारी ऐका सविस्तरपणे
लोणावळा : लोणावळा शहरात अनेक खाजगी बंगल्यांमध्ये अनाधिकृतपणे स्विमिंगपूल बांधण्यात आले आहे. याठिकाणी पर्यटकांची कसलीही काळजी घेतली जात नसल्याचे लोणावळा शहरात घडलेल्या दोन घटनांवरुन समोर आले आहे. शहरातील जे खाजगी बंगले बेकायदेशीरपणे भाड्याने दिले जात आहेत तसेच ज्याठिकाणी नगरपरिषदेची कसलीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे स्विमिंगपूल बांधण्यात आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी लोणावळा नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. तुंगार्ली येथील खाजगी बंगल्यात एका दोन वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बंगला मालक व केअर टेकर यांच्यासह लोणावळा नगरपरिषदेवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र यानंतर अवघ्या आठ दिवसात पुन्हा दुसरी घटना तुंगार्ली भागातच घडली. याठिकाणी एका तेरा वर्षीय बालकाचा स्विमिंगपूल च्या बाहेर ठेवलेल्या लाईटचा शाॅक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही असे पुजारी यांनी सांगितले. हजारो रुपये घेऊन शहरात बेकायदेशीरपणे पर्यटकांना खाजगी बंगले भाड्याने राहण्यासाठी दिले जातात. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेबाबत याठिकाणी कोणतीही उपाययोजना केली जात नाही असा आरोप जाधव व पुजारी यांनी केला आहे. लोणावळा नगरपरिषदेने शहरातील शहरातील बंगल्यांचा सर्व्हे केला असता 957 बंगल्यांमध्ये स्विमिंगपूल असल्याचे समोर आले आहे. यापैकी किती स्विमिंगपूल ला नगरपरिषदेची परवानगी घेण्यात आली आहे. याची चाचपणी सुरु असून नगरपरिषदेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे देखील किती बंगल्यांना न्याहारी निवासासाठी परवानगी दिली आहे. याची मागणी केली आहे. लोणावळा नगरपरिषदेने लवकरात लवकर याची चाचपणी करून बेकायदेशीर व्यावसाय करत पर्यटकांच्या जीवाशी खेळणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.