Lonavala News l लोणावळा नगरपरिषद मार्फत एकल वापर प्लास्टिक बंदीबाबत धडक मोहीम; 21 किलो प्लास्टिक जप्त

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेने 3 फेब्रुवारी 2025 रोजी शहरात एकल वापर प्लास्टिक बंदीच्या उल्लंघनावर कडक कारवाई करण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली. या मोहिमेच्या अंतर्गत नगरपरिषदेच्या विविध विभागाचे कर्मचारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकारी यांचा समावेश असलेली एक टीम तयार करण्यात आली होती. मोहिमेचे नेतृत्व नगरपरिषदेचे मिळकत विभागाचे कर्मचारी निलेश भुजबळ, अतिक्रमण प्रमुख विजय साळवी, शहर समन्वयक विवेक फडतरे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकारी सौ. वर्षा कदम यांनी केले.
या मोहिमेदरम्यान 21 किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि त्याच्या विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून 17 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील विविध आस्थापनांमध्ये प्लास्टिक बंदीचे स्टीकर लावले आहे.
लोणावळा नगरपरिषदेने शहरातील सर्व दुकानदार, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांना बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या, थर्मोकॉल, चहासाठीचे प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक चमचे इ. साठवण किंवा विक्री न करण्याचे आवाहन केले. यासोबतच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकारी वर्षा कदम यांनी विक्रेत्यांना या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आणि उल्लंघन केल्यास कडक कारवाईची ताकीद दिली.
लोणावळा नगरपरिषदेतर्फे या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जागरूकता वाढवली गेली आहे. या मोहिमेचा उद्देश शहरात स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. लोणावळा नगरपरिषद येणाऱ्या काळात देखील प्लास्टिक बंदीच्या दिशेने आणखी कडक पावले उचलणार आहे. तरी शहरातील सर्व आस्थापनांनी बंदी असलेले प्लास्टीक विक्री अथवा साठवणूक करु नये. सर्वानी नगरपरिषदेला सहकार्य करुन लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यास सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषदेमार्फत सर्वांना करण्यात आले.