Expressway News : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर लेन कटिंग व अतिवेग ठरतोय जीवघेणा

मावळ माझा न्युज : वेगवान प्रवासासाठी ओळखला जाणारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेस वे लेन कटिंगची समस्या व अतिवेगामुळे जीवघेणा ठरू लागला आहे. तसेच या मार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे देखील वाहन चालक हैराण झाले आहेत.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील अपघाताची समस्या सुटावी व हा महामार्ग 0 फेटालिटी महामार्ग बनावा याकरिता अनेक उपाययोजना करून झाल्या आहेत. वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर स्पीड गनच्या माध्यमातून कारवाई करत कित्येक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर लेन कटिंग करणाऱ्या वाहनांवर सातत्याने कारवाई करत लाखो रुपयांचा दंड आत्तापर्यंत वसूल करण्यात आला आहे. तरीदेखील वाहन चालक एक्सप्रेस वे वर वेग मर्यादा व लेनच्या शिस्तीचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. मागील चार महिन्यापूर्वी या मार्गावर वाहन चालकांना शिस्त लागावी याकरिता महाराष्ट्र परिवहन विभागाच्या वतीने आरटीओ ची काही भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहे. ही पथके एक्सप्रेस वे वर सातत्याने पाहणी करत लेनची शिस्त मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत आहेत. मागील चार महिन्यांमध्ये जवळपास 1800 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील वाहन चालक लेनची शिस्त मोडत असल्याचे वारंवार विशेषता घाट परिसरामध्ये दिसून येत आहेत.