Breaking news

निधनवार्ता l संत तुकाराम सह साखर कारखान्याचे माजी संचालक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग ठाकर सर यांचे निधन

पवनानगर : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग धोंडीबा ठाकर सर (वय 59) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

      त्यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या मंदिर पवनानगर येथे 31 वर्षे शिक्षक तर 1 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केले. नंतर संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी मंदिर कान्हे येथे 4 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले व त्याच शाळेत सेवानिवृत्त झाले. या कालखंडात मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची स्थापना करून अनेक वर्ष संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले. मावळ तालुक्यातील शिक्षक परिषद संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करताना मावळ तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ठाकर सरांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. ठाकर परिवार जनसंघ व भारतीय जनता पार्टी यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले कुटुंब म्हणून सुपरिचित होते. मावळ तालुक्याचे दिवंगत लोकप्रिय आमदार कै. दिगंबर दादा भेगडे, माजी आमदार रूपरेखाताई ढोरे व माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांचे एकनिष्ठ विश्वासू सहकारी म्हणून सुपरिचित होते. त्याचीच पावती म्हणून पक्षाने कै. ॲड. भरत ठाकर यांच्या पत्नी श्रीमती कल्याणीताई ठाकर यांना मावळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती पद दिले तर स्वतः ठाकर सर यांना संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून संधी दिली त्यांनीदेखील त्या संधीचे सोने केले. ठाकर परिवार हा सांप्रदायिक क्षेत्रातील सुपरिचित परिवार म्हणून ओळखला जातो गावच्या जडणघडणीत, विकासामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. अनेक वर्ष त्यांनी गावाचे खजिनदार म्हणून काम पाहिले. अनेक वर्ष शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केल्यामुळे सरांचा जनसंपर्क दांडगा होता. आज त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे 

     त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, सुना, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार असून  सांप्रदायिक क्षेत्रातील ह.भ.प. भिकाजी ठाकर, दशरथ ठाकर व गायाणचार्य ह.भ.प. लक्ष्मण महाराज ठाकर यांचे ते बंधू होत. तसेच महागाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, पवना फुल उत्पादक संघाचे सचिव व कै. ॲड भरत ठाकर प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर ठाकर, पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष, उद्योजक मुकुंद ठाकर यांचे ते चुलते होत. तर उद्योजक प्रशांत ठाकर व प्रफुल्ल ठाकर यांचे ते वडील होत.

इतर बातम्या