Breaking news

काय तो रस्ता अन काय ते खड्डे ! देहूगाव ते येलवाडी फाटा रस्त्याची पुन्हा दुरवस्था; वाहनचालक व नागरिक संतप्त

देहूगाव (प्रतिनिधी) : देहूगाव ते येलवाडी फाटा मार्गावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्यावर अवघा एकच महिना लोटलेला असतानाही पुन्हा रस्ता चाळण झाला आहे. खड्ड्यांनी भरलेला हा मार्ग सध्या वाहनचालक, पादचारी तसेच भंडारा डोंगराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

     या विषयावर बोलताना येलवाडीचे माजी सरपंच नितीन गाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "मागील महिन्यात पावसातच रस्ता खराब झाला होता. पालखी प्रस्थान सोहळा जवळ आल्यामुळे तातडीने जेसीबीच्या सहाय्याने समतलीकरण करून खड्ड्यांत खडी-मुरूम टाकण्यात आले. मात्र, ही डागडुजी केवळ कागदावर होती असे स्पष्ट होत आहे," अशी टीका त्यांनी केली.

       हा रस्ता तळेगाव-चाकण औद्योगिक वसाहत तसेच पिंपरी-चिंचवड शहराशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनांचे नुकसान होत आहे आणि लहान मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यापूर्वी नितीन गाडे यांनी या समस्येवर आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यानंतर तातडीने खड्डे बुजविण्यात आले. मात्र एक महिन्यातच तीच स्थिती निर्माण झाल्याने "काम फक्त तात्पुरतं आणि दिखाऊ झालं होतं का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांनी या रस्त्याच्या कायमस्वरूपी डागडुजीची मागणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ आणि गुणवत्तापूर्ण उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

इतर बातम्या