देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी भर पावसात भाविकांची अलोट गर्दी

राजेंद्र काळोखे | देहूगाव : आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराजांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र देहूत विठ्ठल-रुक्मिणी आणि तुकोबारायांच्या दर्शनासाठी भाविकांनी पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळपासूनच मुसळधार पावसातही छत्र्या अंगावर घेत भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर पालखी मार्गावर भाविकांची गर्दी आणखी वाढली. काही भक्तांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्रत्यक्ष दर्शन घेतले, तर काहींनी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानले. यावेळी देऊळवाडा परिसर भक्तिरसात न्हालेला होता.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने नुकताच पंढरपूरात विसावा घेतला असून, गेल्या 19 दिवसांपासून राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांच्या पायी वारीने पंढरपूर गाठले. मात्र जे भाविक थेट पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, त्यांनी देहूतच श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली. देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, संत तुकाराम शिळा मंदिर आणि राम मंदिर फुलांनी आकर्षकपणे सजवण्यात आले होते. पहाटे चार वाजता संस्थानचे मुख्य पूजारी धनंजय मोरे यांच्या हस्ते काकड आरती व महापूजा पार पडली. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. भाविकांचा ओघ दिवसभर सुरूच होता. मंदिर परिसरात पत्रा शेडची व्यवस्था असल्याने पावसातही दर्शनात अडथळा आला नाही. दर्शन रांगा बाजार आळीपर्यंत पोहोचल्या होत्या. पावसामुळे इंद्रायणी नदीला जोर आला असून, भाविक घाटावर स्नान करून मंदिरात येत होते.
पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, वाहतूक व्यवस्थेत काही अडचणी जाणवल्या. चौदा टाळकरी कमान परिसरात आणि शिवाजी महाराज चौकाकडून येणाऱ्या रस्त्यांवर भाविकांनी दुतर्फा वाहने लावल्याने रहदारीला अडथळा झाला. गावात सक्षम पार्किंग व्यवस्थेचा अभाव जाणवला. काही वाहनचालकांनी वाहने थेट नदीपात्रातील घाटावर लावल्याने पावसाचे पाणी वाढल्यास संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, याकडे पार्किंग व्यवस्थापकांचे दुर्लक्ष स्पष्ट दिसून आले. भाविकांच्या श्रद्धेने ओथंबलेल्या या एकादशीला देहूतील वातावरण भक्तिभावाने भरून गेले होते. पावसातही न थांबणारी भक्तांची रीघ हे श्रद्धेचे खरे रूप होते.