Breaking news

Lonavala News : आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली राजकीय पक्षांची बैठक

लोणावळा : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये काय करावे व काय करू नये याबाबत लोणावळ्यातील राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज बैठक घेत माहिती दिली तसेच राजकीय मंडळींच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकाचे समाधान केले.

    लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाली असून याच आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विविध धार्मिक सण उत्सव महापुरुषांच्या जयंती व विविध गावातील जत्रा येत असल्याने आचारसंहितेचे पालन करून हे सण उत्सव कशा पद्धतीने साजरे केले जावेत याबाबत लोणावळ्यातील राजकीय पक्ष व विविध गावातील उत्सव समिती यांच्यामध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे, लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी मावळ विधानसभा क्षेत्रातील निवडणूक अधिकारी मावळचे प्रांत यांना लोणावळा शहरामध्ये एक बैठक घेत सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व विविध गावांमधील उत्सव कमिट्यांचे प्रमुख यांना आचारसंहितेचे नियम व आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काय करावे काय करू नये तसेच कोणत्या कार्यक्रमासाठी कोणत्या परवानग्या घ्याव्यात याबाबतची माहिती देण्यात यावी अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर आज लोणावळा नगर परिषदेमध्ये ही आचारसंहिते संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीला निवडणूक कामकाज पाहणारे नायब तहसीलदार गणेश तळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी संताजी जाधव, लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे उपस्थित होते.

       बैठकीमध्ये अशोक साबळे यांनी आचारसंहितेची नियमावली ही उपस्थित सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच विविध गावातील उत्सव समितीचे पदाधिकारी ,शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते व हिंदू समितीचे पदाधिकारी यांना वाचून दाखवली. त्यानंतर नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न, कोणत्या कार्यक्रमासाठी कोणती परवानगी कुठून घेतली जा, याबाबतची सविस्तर माहिती गणेश तळेकर यांनी दिली. सार्वजनिक कार्यक्रमांच्या व्यतिरिक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या राजकीय सभा, मिरवणुका, पदयात्रा रोडशो होणार आहेत, त्याकरिता वाहन परवानगी, तात्पुरती कार्यालय, कोपरा सभा, फलक परवाना कुठून घ्यावा याबाबतची माहिती उपस्थित त्यांना दिली. तसेच निवडणुकीच्या व आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथे सुरू करण्यात आलेली सुविधा अँप, मतदान कक्ष, मीडिया सेल, आचारसंहिता कक्ष व त्यांच्या माध्यमातून चालणारी कामे याबाबतची माहिती दिली. तसेच निवडणूक कालावधीमध्ये होणाऱ्या राजकीय व सामाजिक कार्यक्रमांवरती लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी भरारी पथके, तपासणी टीम व व्हिडिओ सर्विलियंस टीम तयार करण्यात आलेल्या आहेत, त्यांची कामे कशा पद्धतीने चालणार याची देखील माहिती देण्यात आली. राजकीय सभा कुठे घेतल्या जाव्यात याबाबतची मैदानांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

      सोबतच शासकीय विश्रामगृहे ही राजकीय कार्यक्रमासाठी वापरता येणार नाहीत असे सांगण्यात आले. खाजगी वाहने व रुग्णवाहिका यावरील राजकीय पक्षांची चिन्हे व नावे ही झाकण्यात यावी असे यावेळी सांगण्यात आले. जे अराजकीय कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम असतील त्यांच्या परवानग्या यापूर्वी प्रमाणेच लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस स्टेशन याच ठिकाणावरून मिळणार आहेत. राजकीय कार्यक्रमासाठी लागणाऱ्या या मात्र वडगाव येथील एक खिडकी या ठिकाणाहून घ्याव्या लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

    गणेश तळेकर म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता शासनाच्या वतीने विविध पथकांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्ष व राजकीय पक्षांची संबंधित असणारे पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी उपक्रम राबवताना आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वतोपरी खबरदारी घ्यावी. जो कार्यक्रम आपण करणार असाल त्या कार्यक्रमाची आपण पूर्वपरवानगी घेऊनच कार्यक्रम करावेत. बॅनर कोठे लावणार आहात, झेंडे कुठे लावणार, स्टेज कोठे व कसा असेल याबाबतच्या परवानग्या घेऊनच कार्यक्रम करावेत व आचारसंहितेचा कोठेही भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.



इतर बातम्या