Breaking news

Ekvira Devi : आई एकविरा देवीच्या गडावर महानवमी होम हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

महानवमी होमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा महानवमी होम आज पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास प्रज्वलित करण्यात आला. मध्यरात्रीनंतर देवीची नववी माळ लावत घट उठविण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंत्रोच्चारणा करत होम प्रज्वलित करण्यात आला. होमात पुर्णाहुती दिल्यानंतर भाविकांची दर्शनरांग सुरु करण्यात आली. दरम्यान सोमवारी मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. देवीचे व होमाचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविक गडावर येऊन थांबले होते. होम प्रज्वलित होताच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. आज गडावर देवीच्या दर्शनाची एक रांग व होमाच्य दर्शनाची दुसरी रांग अशा दोन रांगा पहायला मिळाल्या. महानवमी व दशमी यावर्षी वेगवेगळ्या दिवशी आल्याने दिवसभर गडावर होमाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी राहणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेता आले नव्हते तसेच नवरात्र उत्सव व मानाच्या होमाला गडावर येता आले नव्हते. यावर्षी मात्र निर्बंधमुक्त उत्सव असल्याने नवरात्रीचे नऊ दिवस गडावर गर्दी होती. शनिवारी व रविवारी गडावर उच्चांकी गर्दी झाली होती. यात्रा काळात किमान चार लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यावर्षी भाविक मोठ्या संख्येने आल्यामुळे व्यावसायिक देखील आनंदित होते. कार्ला गडावर पारंपारिक हार फुल विक्रीचा व्यावसाय करणार्‍या विक्रेत्यांसोबत इतर साहित्यांची दुकाने देखील वाढली आहेत. रिक्षा चालकांचा देखील चांगला व्यावसाय झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. गडावर येणार्‍या भाविकांना योग्य पद्घतीने दर्शन घेता यावे याकरिता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या वतीने नियोजन करण्यात आले होते. स्थानिक पोलीस व मुख्यालय बंदोबस्त असा जवळपास दिडशेहून अधिक पोलीस जवान, महिला पोलीस तसेच अधिकारी व विविध पथके तैनात होती. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात व निर्विघ्नपणे देवीचा नवरात्र उत्सव पार पडला.

महानवमी होमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इतर बातम्या