Breaking news

Maval Loksabha Election | मावळ लोकसभेसाठी आता लोणावळ्यातून देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; भांगरवाडीतून उमेदवारी अर्ज दाखल

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी लोणावळा शहरामधून 24 एप्रिल रोजी भांगरवाडी येथील रचना गार्डन मध्ये राहणारे सुहास मनोहर राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोणावळा शहराची मतदार संख्या 50 हजाराच्या जवळपास असल्याने राणे यांच्या उमेदवारीने चर्चेला उधाण आले आहे. आज 25 एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने आज कितीजण उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

      मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील चिंचवड, पिंपरी, मावळ हे तीन विधानसभा मतदार संघ तर रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल हे तीन विधानसभा मतदार संघ यांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदार संघाची मतदार संख्या ही 25 लाख 9 हजार 451 इतकी आहे. याठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी महपौर संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून महायुतीच्या वतीने शिवसेना पक्षाकडून खासदार श्रीरंग बारणे यांना तिसऱ्या उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट रंगणार सामना वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी होणार असे चित्र असताना पनवेल, कर्जत, पिंपरी चिंचवड, मावळ, लोणावळा भागातून अनेक अपक्ष उमेदवार व इतर प्रादेशिक पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून छाननी व माघारी नंतर महणजेच 29 एप्रिल नंतर मावळ लोकसभा मतदार संघातील लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. सुहास राणे हे चेंबूर विधानसभा मतदार संघातील मतदार आहे. ते लोणावळा भांगरवाडी येथील रचना गार्डन या ठिकाणी राहण्यास आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणूक ते अपक्ष म्हणून नशीब अजमावणार आहेत. दरम्यान महाविकास आघाडी व महायुतीच्या वतीने प्रचाराचा नारळ फोडत मतदार संघात प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.

इतर बातम्या