Breaking news

31 मे पर्यंत कार्ला मळवली दरम्यानचा इंद्रायणी नदीवरील पुल न झाल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा एकविरा कृती समितीचा इशारा

लोणावळा : कार्ला मळवली दरम्यानचा इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम 31 मे पर्यंत पूर्ण न झाल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा एकविरा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास परिसरातील गावांना त्याचा फार मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याने पंचक्रोशीतील नागरिक चिंतित झाले आहेत.

      कार्ला मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्याने तो पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. 100 मीटर लांब व 10 मीटर रुंद एवढे हे मोठे काम असून ऑक्टोबर महिन्यापासून या कामाला सुरुवात झाली आहे. एक जून नंतर पावसाळा सुरू होणार असल्याने मे महिन्यात हे काम पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. मळवली भागामध्ये जगप्रसिद्ध भाजे लेणी, लोहगड व विसापूर हे किल्ले असल्याने महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक या परिसरामध्ये येत असतात. पुलाचे काम पूर्ण न झाल्यास येणाऱ्या पर्यटकांना व कार्ला मळवली परिसरातील पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच 25 गावांचा संपर्क तुटणार असल्याने या भागातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक या सर्वांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. नदीपात्रात पुलाचे काम सुरू आहे. त्याकरिता शेजारून तात्पुरत्या स्वरूपामध्ये मातीचा भराव करून रस्ता बनवण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात काम करताना जे मातीचे उत्खनन करण्यात आले आहे ती माती देखील पात्रात पडून आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मातीचा हा राडाराडा बाजूला न केल्यास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते पाणी आजूबाजूच्या भात शेतीमध्ये पसरून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. साधारणपणे 7000 एकर क्षेत्र या भागात असल्याने सदरचे नुकसान टाळण्यासाठी व या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय व पर्यटन व्यवसायावर येणारी गदा रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिवस रात्र एक करत सदरचे काम 31 मे पर्यंत पूर्ण करावे अशी मागणी एकविरा कृती समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. तसेच 31 मे पर्यंत काम पूर्ण करण्याबाबतची लेखी हमी द्यावी अन्यथा 9 मे रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

      या बाबतचे निवेदन वडगाव येथील सार्वजनिक बांधकांम विभागाचे उप अभियंता दराडे यांंच्या कार्यालयात जाऊन एकविरा कृती समितीचे अध्यक्ष  बाळासाहेब भानुसघरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत मोरे, नंदकुमार पदमुले, गुलाब तिकोणे, विजय तिकोणे, उस्मान इनामदार, अमित ओव्हाळ, नवनाथ कडु, रोहिदास हुलावळे, विकास वाल्हेकर व एकवीरा कृती समितीचे सदस्य व कार्ला, मळवली परिसरातील ग्रामस्थ यांनी दिले आहे.

इतर बातम्या