Breaking news

Lonavala News l लोणावळा शहर भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी मोठी रस्सीखेच; अध्यक्ष पदासाठी 12 जण इच्छुक

लोणावळा : लोणावळा शहर भाजपा मध्ये अध्यक्ष पदासाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अध्यक्ष पदाची खुर्ची मिळवण्यासाठी तब्बल 12 इच्छुकांनी आपले अर्ज पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केले आहेत. भारतीय जनता पार्टी कडून मंडळ रचना करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये लोणावळा शहर मंडल, कुसगाव आणि वाकसई गण मिळून नवीन मंडल तयार करण्यात येणार आहे. शहरी भाग व ग्रामीण भाग यांचा मेळ बसवत हे नवीन लोणावळा मंडळ तयार होणार असल्याने याकरिता इच्छुकांची देखील संख्या वाढली आहे. मागील दीड वर्षापासून लोणावळा शहर मंडळ अध्यक्ष म्हणून अरुण वसंत लाड हे काम पाहत आहेत. लोणावळा शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष, मावळ तालुका भाजपा कार्याध्यक्ष व लोणावळा शहर मंडल अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली आहेत. खरंतर त्यांचा दीड वर्षाचा कार्यकाळ अद्याप शिल्लक असल्याने पक्ष श्रेष्ठ नवीन अध्यक्ष निवडणार की अरुण लाड यानांच पुन्हा काम करण्याची संधी देणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

     14 एप्रिल रोजी भाजपा लोणावळा शहर मंडळ अध्यक्ष पदाबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस संजय रौंदळ व महाराष्ट्र प्रदेश भाजपा सदस्य जितेंद्र बोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये लोणावळ्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव व लोणावळा शहर भाजप मंडळाचे अध्यक्ष अरुण लाड यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. 

      भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय धोरणानुसार सर्व स्तरावर फेररचना व पदाधिकारी नियुक्त हे उपक्रम सुरू आहे. लोणावळा शहर मंडलाच्या नूतन अध्यक्ष पदाचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो. मात्र या पदाला जेमतेम दीड वर्ष पूर्ण झाले आहे. असे असले तरी पक्ष धोरण व निर्णयानुसार नवीन मंडल फेररचना व नूतन अध्यक्ष निवडीबाबत विचार विनिमय सुरू आहे. १४ एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये विद्यमान अध्यक्ष अरुण लाड यांच्यासह अनिल गायकवाड व इतर दहा जण असा एकूण बारा जणांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. यापैकी लाड व गायकवाड हे दोन प्रमुख दावेदार मानले जात आहे. अरुण लाड यांचा दीड वर्षाचा कार्यकाल शिल्लक आहे तसेच त्यांनी यापूर्वी मावळ तालुका कार्याध्यक्ष व लोणावळा शहर अध्यक्ष या पदावर काम केले असल्याने त्यांचा लोणावळा शहर मंडल व नाणे मावळच्या ग्रामीण भागामध्ये चांगला जनसंपर्क व कार्यकर्त्यांवर पकड आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्ता भाऊ गुंड यांच्यासोबत त्यांनी संपूर्ण तालुक्याचा दौरा करत भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते यांना भेटण्याचा व त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

     मागील वर्षी 2024 या वर्षांमध्ये पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये लोणावळा शहरांमधून अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनील शेळके या दोघांनाही महायुतीच्या माध्यमातून भरघोस असे यश प्राप्त झाले आहे. मागील दीड वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये काम करत असताना लोणावळा शहर भाजपामध्ये निर्माण झालेली दुफळी दूर करत सर्व गट तट व आजी-माजी पदाधिकारी यांना एकत्र आणण्याची जबाबदारी लीलया लाड यांनी पेलली होती. तसेच भाजपचे विविध उपक्रम राबवत पक्ष वाढीसाठी मोठे काम केले आहे. त्याच्याचमुळे विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला लोणावळ्यांमधून मोठे यश प्राप्त झाले आहे. लोणावळा शहरांमधून बारा इच्छुकानी मंडळ अध्यक्ष पदासाठी दावा दाखल केला असला तरी लोणावळा भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, शहराध्यक्ष यांनी मात्र अरुण लाड यांच्याच नावाला पसंती देत त्यांनाच अध्यक्षपदाची पुन्हा संधी द्यावी अशी विनंती भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्याकडे केली आहे. सर्वसमावेशक नेतृत्व व दांडगा जनसंपर्क यामुळे सध्या तरी अरुण लाड यांचे पारडे अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये जड मानले जात असले तरी पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतर बातम्या

मोठी बातमी l लोणावळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का; पक्षांतर्गत गटा तटाच्या राजकारणाला कंटाळून अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश