Shree Shivaji Mitra Mandal Trust : लोणावळ्यात मावळच्या राजासमोर हुडको येथील अन्नपूर्णा महिला भजनी मंडळाचे भजन संपन्न

लोणावळा : मावळचा राजा म्हणजेच श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्या बाप्पांसमोर आज दुपारी हुडको येथील अन्नपूर्णा महिला भजनी मंडळाच्या वतीने भजन करण्यात आले. गणेश उत्सव दरम्यान श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल बाप्पासमोर अथर्वशीर्ष पठण करण्यात आले होते. तर आज भजन करत जागर करण्यात आला. उद्या शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता शिवसेवा प्रतिष्ठानची लहान मुले बाप्पांच्या समोर अथर्वशीर्षाचे पठण करणार आहेत.
श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टने यावर्षी लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत उत्सव स्थळाच्या ठिकाणी संकल्प नशा मुक्ती अभियानाचे फलक लावत नशा मुक्तीची जनजागृती केली आहे. बाप्पांसाठी यावर्षी पुरंदरे शाळा मैदान येथे तिरुमाला तिरुपती मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली असून मंदिराच्या समोर आकर्षक फाउंटन तयार करण्यात आले आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आलेल्या गणेश भक्तांच्या स्वागताकरिता मंदिरामध्ये उपस्थित रहात आहेत. मंडळाच्या वतीने यावर्षी उत्सव काळामध्ये स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिल्या दिवसापासूनच देखावा भाविकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आल्याने रोज भाविक दर्शनासाठी व देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.