Breaking news

Lonavala Ganesh Festival : लोणावळा शहर व परिसरात घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन

लोणावळा : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… असा जयघोष करत लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात घरोघरी आज लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या जल्लोषात व उत्साहात झाले. पहाटेपासूनच बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू होती. कालपासून वरून राजाने देखील लोणावळा परिसरात चांगलीच हजेरी लावली होती. सकाळच्या सत्रात मात्र पावसाने काहीशी उघडीप दिल्याने सर्वत्र बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी व पुरोहितांची धावपळ पहायला मिळत होती. मोठया भक्ती भावाने व जल्लोषपूर्ण वातावरणात ढोल ताशांचा गजर करत बाप्पांचे आगमन झाले.

     14 विद्या व 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या आगमनाची तयारी मागील काही दिवसांपासून सर्वत्र सुरू होती. काही दिवसांपासून घरोघरी आरास सुरू होती. काही ठिकाणी बाप्पांच्या मूर्ती घरी आणत त्याला डायमंड व इतर ज्वेलरी लावण्याचे काम सुरू होते. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने यावर्षीचा गणपती उत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून संकल्प नशा मुक्ती अभियान या गणेशोत्सवात राबवत युवकांना विविध प्रकारच्या नशांपासून दूर राहण्याकरिता जनजागृती करण्याचे आवाहन गणेश मंडळांना करण्यात आले आहे. या दोन्ही प्रशासकीय सूचनानुसार गणेश उत्सव साजरा करण्यावर अनेकांनी भर दिला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कुसगाव भागामध्ये घरगुती गणेश उत्सवामध्ये विविध प्रकारचे लक्षवेधी डेकोरेशन बनविण्याची मागील काही वर्षांची परंपरा या वर्षी देखील कायम आहे.

      सकाळच्या सत्रामध्ये घरगुती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर दुपारपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुका सुरू झाल्या होत्या. ढोल ताशांचा गजर व पारंपारिक वाद्य वाजवत मंडळाचे कार्यकर्ते गणपती बाप्पांच्या मूर्ती मंडळाच्या ठिकाणी घेऊन जात होते. गुलाबाची देखील मुक्त हस्ते उधळण सुरू होती. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने बाप्पांच्या आगमन मिरवणुकीमध्ये जल्लोष पहायला मिळत होता. मागील तीन वर्ष कोरोनामुळे गणेश उत्सव साध्या पद्धतीनेच साजरा झाला होता. यावर्षी मात्र सर्वत्र मोठा उत्साह व जल्लोष पाहायला मिळत आहे. बाजारपेठेमध्ये अगदी सकाळपासूनच हार, फुले व डेकोरेशनचे साहित्य, फळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लोणावळा शहर पोलीस व वॉर्डन वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी सकाळपासूनच चौकाचौकांमध्ये तैनात होते. अतिशय आनंदी वातावरणामध्ये आज लोणावळा शहर व सर्व परिसरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन झाले. काही ठिकाणी दीड दिवसांचे, काही ठिकाणी पाच दिवस, काही सहा दिवस, सात दिवस नऊ दिवस व दहा दिवस अशा प्रकारचे बाप्पा विराजमान झाले आहेत. लोणावळा शहरात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणारी 51 मंडळे आहेत.

इतर बातम्या