लोणावळ्यात सामाजिक ऐक्य व सलोखा कायम राखण्यासाठी शांतता कमिटीची बैठक संपन्न

लोणावळा : पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरातील सामाजिक सलोखा व ऐक्य कायम राखण्यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सोमवारी (24 मार्च) झालेल्या या बैठकीला सर्व जाती-धर्मांचे प्रमुख, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, युवा नेते आणि विविध मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सोशल मीडिया प्रकरणानंतर शांतता राखण्याचा प्रयत्न
मागील आठवड्यात एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यानंतर बजरंग दल व युवा सेना यांनी लोणावळा पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आणि संबंधित तरुणाने सोशल मीडियावर माफीही मागितली. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, म्हणून पोलिसांनी हा शांतता संवाद आयोजित केला होता.
बैठकीत सर्वपक्षीय सहकार्याचा विश्वास
या बैठकीस लोणावळा शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांच्या उपस्थितीत विविध राजकीय व सामाजिक नेत्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी नगरसेवक निखिल कवीश्वर, भाजपाचे गटनेते व माजी नगरसेवक देविदास कडू, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, भाजपा लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष श्वेता वर्तक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे लोणावळा शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, मुस्लिम समाजाचे फिरोज शेख, जाकीर खलिफा यांनी या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये आपली मते व भावना व्यक्त करताना लोणावळा शहरातील सर्वपक्षीय प्रमुख मंडळी ही लोणावळा शहरातील सामाजिक ऐक्य, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव एकमेकांच्या सोबत काम करतील असा विश्वास पोलीस प्रशासनाला दिला.
युवा पिढीला सोशल मीडियाच्या जबाबदारीची जाणीव आवश्यक
बैठकीत मान्यवरांनी सोशल मीडियाच्या गैरवापरावर चिंता व्यक्त केली. 17 ते 25 वयोगटातील तरुण अनेकदा कोणतेही विचार न करता समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट करतात. त्यामुळे पालक, समाजप्रमुख आणि शिक्षकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे मत बैठकीत मांडण्यात आले.
शिवरायांविषयी सर्वधर्मीयांचा एकमताने आदर
बैठकीत उपस्थित सर्वधर्मीय नेत्यांनी एकमुखाने सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. आम्ही वेगवेगळ्या समाजांचे असलो, तरी आमचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झालेला आहे. आम्ही सदैव छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि राहू." कोणीही शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास सर्व समाज एकत्र येऊन सामाजिक ऐक्य व शांतता राखण्यासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला.
सण-उत्सव सर्वांनी मिळून साजरे करण्याचा संकल्प
येत्या काळात विविध धर्मीयांचे सण व उत्सव सर्वांनी एकत्र येऊन शांततेत साजरे करावेत, असे ठरवण्यात आले. शहरातील सामाजिक एकता टिकवण्यासाठी सर्व पक्ष, संस्था आणि नागरिक एकत्रित राहतील, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला. ही बैठक सामाजिक सलोखा आणि शांततेसाठी महत्त्वाची ठरली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिस व समाज यांचे सहकार्य टिकून राहील, असा विश्वास या चर्चेतून व्यक्त करण्यात आला.