कैवल्यधाम लोणावळा येथे १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे 21 जून रोजी आयोजन ; 'निरोगी वार्धक्यासाठी योग' या संकल्पनेवर भर
लोणावळा : जगभरात आरोग्याचा संदेश देणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, लोणावळा येथील जगप्रसिद्ध 'कैवल्यधाम योग संस्था' आणि आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 'निरोगी वार्धक्यासाठी योग' (Yoga for Healthy Aging) या अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा सोहळा रविवार, २१ जून २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता कैवल्यधाम संस्थेच्या 'कुडीलाल सेक्सरिया हॉल' येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, त्यानंतर 'सामान्य योग पद्धती' (Common Yoga Protocol) सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात कैवल्यधामच्या कुशल योगशिक्षिका सुश्री देबश्री गांगुली आणि श्री. सागर ठाकूर हे योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या सत्राचे नियोजन संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. सुबोध तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
लोणावळा आणि परिसरातील नागरिकांना आवाहन
कैवल्यधाम संस्थेच्या वतीने लोणावळा शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन श्री. सुबोध तिवारी यांनी केले आहे. आरोग्य, सुसंवाद आणि आनंदी जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शताब्दी वर्षात कैवल्यधामचा उपक्रम
१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (IDY) काउंटडाउनचा भाग म्हणून कैवल्यधामने गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये शैक्षणिक संस्था, संरक्षण आस्थापने, सागरी अकादमी, शाळा आणि विविध सामुदायिक गटांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना, समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत योग पोहोचवणे आणि त्याद्वारे निरोगी वार्धक्याला प्रोत्साहन देणे हे कैवल्यधामचे मुख्य ध्येय आहे. एक संस्था. एक ध्येय. समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत योग पोहोचवणे, या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन कैवल्यधाम संस्था यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन आरोग्य आणि कल्याणाचा एक अविस्मरणीय सोहळा म्हणून साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे.
कार्यक्रमाचा तपशील
दिवस आणि दिनांक : रविवार, २१ जून २०२६
वेळ : सकाळी ८.०० वाजता
स्थळ : कुडीलाल सेक्सरिया हॉल, कैवल्य
धाम, लोणावळा.






















