Breaking news

Khalapur News : जांबरूंग गावातील दरडग्रस्त परिस्थितीचा घेतला महसूल आणि पोलीस प्रशासनाने आढावा

खालापुर: खालापूर तालुक्यातील जांबरूग गावात मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेजारच्या डोंगरावरून काही मोठे दगड घसरून खाली आले होते. सुदैवाने त्या घटनेत जिवीतहानी झाली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर यंदा असा संभाव्य प्रकार झाल्यास उपाय योजनांचा  आढावा तसेच गावकऱ्यांनी दक्ष रहावे या संबंधीची चर्चा करणे करिता  जिल्हाधिकारी रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार आणि महसूल तसेच आपत्कालीन कृती दलाच्या पदाधिकारी गुरूनाथ साठेलकर व इतरांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली व गावकऱ्यांशी संवाद साधला.

     मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत काही मोठ्या आकाराचे दगड डोंगरावरून खाली आले होते. त्याची पुनरावृत्ती होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, तहसीलदार आयुब तांबोळी, पोलीस निरिक्षक शिरीष पवार यांनी गावकऱ्यांसमवेत  डोंगरमाथ्या पर्यंत जाऊन धोकादायक क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेत कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन केले. त्यानंतर गावातील समाज मंदिरात गावकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी घटना घडण्यापूर्वी, घडल्यास आणि घडल्यानंतर काय करावे या संदर्भात सल्लामसलत करताना नागरिकांच्या मनातून दरड कोसळण्याची भीती काढण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार आयुब तांबोळी यांनी महसुल प्रशासन संपूर्णपणे दक्ष असल्याचे सांगत अतिवृष्टीच्या वेळी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. रात्री अपरात्री आणि दिवसाढवळ्या नागरिकांनी कसे सतर्क रहावे आणि आपल्या समाज बांधवांसाठी गावांतील युवक आणि युवतींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे या संबंधी सूचना केल्या.  धोक्याची लक्षणे आढळताच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सुरक्षा यंत्रणांशी संपर्क करावा जेणेकरून घटनेची तीव्रता कमी होईल असे संवादातून स्पष्ट केले. या बैठकीला गावातील बहुतांशी महिलांनी सहभाग घेतला होता. नागरी कृती दलाकडूनही गावकऱ्यांना मार्गदर्शन केले गेले. 

    आपत्कालीन प्रसंगी सतर्क होण्यासाठी महसूल प्रशासनाकडून धोक्याच्या कशा सूचना दिल्या जातील तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी नागरिकांशी कसा संवाद साधला जाईल याचे विश्लेषण केले. ग्रामपंचायत प्रशासनाला नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोताला अडवणूक होणार नाही अशा पद्धतीने नाले साफसफाई करण्याचे निर्देश यावेळी दिले गेले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थलांतरित करावयाची विविध ठिकाणे व आरक्षित इमारतींची पाहणी देखील केली गेली. महसूल, पोलीस, ग्रामपंचायत प्रशासन, नागरी कृती दल आणि गावकऱ्यांच्या समन्वयातून दरड कोसळण्याच्या संभाव्य आपत्तीला धैर्याने सामोरे जाण्याचा या निमीत्ताने निर्धार व्यक्त केला गेला.

इतर बातम्या