Breaking news

कोकणसाठी जुनी संचमान्यता लागू करा : आमदार शेखर निकम

मुंबई/ प्रतिनिधी (विलास गुरव) : १५ मार्च २०२४ रोजी लागू झालेल्या नवीन संचमान्यतेच्या शासन निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले असल्याचा गंभीर आरोप करत आमदार शेखर निकम यांनी कोकणासाठी जुनी संचमान्यता लागू करा, अशी मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली. 

     कोकणच्या नव्या शैक्षणिक धोरणाविरुद्धा पावसाळी अधिवेशनात आवाज उठविताना आ. शेखर निकम यांनी सांगितले की, या नव्या परिपत्रकामुळे जिल्हा परिषदच्या माध्यमिक शाळांतील शिक्षक 'सरप्लस' ठरणार असून केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच सुमारे ७०० ते ८०० शिक्षकांना 'सरप्लस' घोषित केले जाण्याची शक्यता आहे सुमारे ६१ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

       कोकणातील दोन वाड्यामधील अंतर अवघे २ ते ३ कि.मी. असूनही शिक्षक कमी करणे आणि शाळा बंद करणे हे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यास अन्यायकारक ठरणारे पाऊल आहे. आजही अनेक विद्यार्थी डोंगरदऱ्या ओलांडून शिक्षणासाठी जातात. अशा भागात एका शिक्षकाकडून सर्व विषय शिकवण्याची अपेक्षा करणे अशक्य आहे. त्यामुळे ८ जानेवारी २०१६ चे जुने संचमान्यतेचे परिपत्रक किमान कोकणासाठी तरी पुन्हा लागू करावे, जेणेकरून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी विनंती केली आहे. आमदार निकम याच्या मागणीवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत हा मुद्दा अत्यंत गंभीर असून योग्य तो विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

इतर बातम्या