Breaking news

Devendra Fadanvis : मावळातील शेतकर्‍यांवर गोळीबार झाला तेव्हा जालियनवाला बाग का आठवली नाही - देवेंद्र फडणवीस

मुंबई : मावळात बंदिस्त जलवाहिनीला विरोध करणार्‍या निष्पाप शेतकर्‍यांवर गोळ्या झाडल्या तेव्हा ह्यांना जालियनवाला बाग आठवली नाही, राजस्थानमध्ये शेतकर्‍यांना लाठ्या काठ्यांनी तुडविले जाते, तेव्हा देखील जालियनवाला बाग आठवत नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता उत्तरप्रदेशातील लखीमपुर घटनेची तुलना करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.

   उत्तरप्रदेशातील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडीचा समाचार घेतला. महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे. या नेत्यांना शेतकर्‍याप्रती खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यात लक्ष घातले आहे आणि तेथील सरकार कारवाई करण्यासाठी समर्थ आहे.

मात्र, आज महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. राज्यात 2 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. त्यांना ना कर्जमाफीचा लाभ, ना कोणती मदत. अशात त्यांना मदत देणे सोडून सरकार पुरस्कृत दहशतवाद या नेत्यांनी हाती घेतला आहे. निष्पाप लोकांना मारहाण केली जात आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने जनतेला बंद करण्यासाठी बाध्य केले जात आहे. संपूर्ण सरकारी व्यवस्थेचा हा मोठा गैरवापर आहे.

    कोरोनामुळे मागील दिड वर्षापासून महाराष्ट्र बंदच आहे. आता कुठे थोडंस रुळावर येत असताना सरकार पुन्हा बंद करत सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याची टिका फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

इतर बातम्या